पनवेल : बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौथा लॉकडाऊन आता संपत आला आहे. पनवेल रेड झोनमध्ये येत असले तरी देखील काही नागरिक परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असलेले पहावयास मिळत आहेत. पावसाळ्यापूर्वीच्या खरेदीसाठी पनवेलमध्ये काही नागरिक बाहेर पडत आहेत.
पनवेल बाजारपेठेत नागरिक आपापली मोठी वाहने घेऊन जात आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असल्याने नागरिक विविध वस्तूंच्या साठवणुकीसाठी व खरेदीसाठी पनवेलच्या बाजारात गर्दी करताहेत. पनवेल महापालिका हद्दीत कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे असे असले तरी काही नागरिक मच्छी, फळे-भाजीपाला यासाठी मोठ्या संख्येने बाजारात गर्दी करू लागले आहेत.
तसेच मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग करीत असल्याने उरण नाका, टपाल नाका, भाजी मार्केट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जाणवू लागली आहे. मसाल्याचे पदार्थ खरेदीसाठी व मसाला दळण्यासाठी काही महिला मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत.