Breaking News

नवी मुंबईत 114 जणांना कोरोना; सात मृत्युमुखी

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत शनिवारी (दि. 30) एकाच दिवशी 114 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी एकाच दिवसात 277 बरे झालेल्या व्यक्तींमुळे दिलासा मिळाला होता, या दिलासादायक बाबीवर देखील विरजण पडले आहे. दररोजचा आकडा वाढत असताना नवी मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब ठरली होती. त्यात शनिवारी अधिक भर पडली. तर मृतांच्या संख्येने देखील उच्चांक गाठलेला दिसून आला. शनिवारी 90 जण बरे झाले झाल्याने घरी परतलेल्या व्यक्तींचा आकडा एक हजार 249 वर पोहोचला आहे. 114 नव्या रुग्णांची भर पडल्याने बधितांची एकूण संख्या दोन हजार 110 वर पोहोचली आहे. सद्य स्थितीत एकूण 792 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.  शनिवारची बधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 15, नेरुळ 22, वाशी 14, तुर्भे 41, कोपरखैरणे 15, घणसोली 4, ऐरोली 2, दिघा 1 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे.  दरम्यान नेरुळमध्ये एकाच घरातील वडील व मुलाचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनामुळे भाजीपाला व्यापारी असलेले 28 वर्षीय व्यापार्‍याचा मृत्यू झालेला असतानाच त्याच्या वडिलांचा देखील कोरोनाने मृत्यू झाल्याने नेरुळ परिसरात या हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्य म्हणजे या तरुण मुलाच्या आजोबांचे देखील याच महिन्यात वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

रसायनीत आणखी एक पॉझिटिव्ह ; 11 वर्षीय मुलाची कोरोनावर मात

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनीत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून शनिवारी (दि. 30) आणखी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे रसायनी परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या 11 झाली आहे. तर दिलासादायक बातमी अशी आहे की, शिवनगरवाडी येथील एका अकरा वर्षीय मुलाने कोरोनावर मात केली आहे. वावेघर येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली असून या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तपास सुरु आहे. तर काही संशयितांचे कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी आहे. कोरोनाचा उपचार घेऊन घरी सोडण्यात आलेल्या मुलावर पुष्पवर्षाव करुन त्याचे शिवनगर वाडीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर कैरे येथील एका कंपनीतील चौदा जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने रसायनीकरांची सुटकेचा श्वास सोडला आहे.

उरणमध्ये आढळला एक कोरोनाबाधित

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील करंजा सुरकीचा पाडा  येथील  41 वर्षीय व्यक्ती शनिवारी (दि. 30) कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यास  कामोठे एमजीएम येथे उपचारसाठी ठेवण्यात आले आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 154 झाली होती. त्यातील 131 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

उरणमध्ये कंटेनर यार्डला आग; सात कंटेनर जळून खाक

उरण : उरण-पनवेल बायपास मार्गावरील भवानी शिपिंग कंटेनर यार्डमध्ये शनिवारी (दि. 30) सायंकाळी आग लागली. या आगीत सुमारे सात कंटेनर जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग तासाभरात आटोक्यात आणली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply