
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 30) तळोजा मजकूर गावाला भेट दिली व पाहणी केली. गेल्या पावसाळ्यात तळोजा मजकूर गावात पुराचे पाणी येऊन अनेक कुटुंबांचे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर हा पाहणी दौरा होता.
पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने तळोजा मजकूर गावाला पुराला सामोरे जावे लागते. पुराच्या वेळीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी परिस्थितीची पाहणी केली होती तसेच त्यावर त्वरित कार्यवाही करीत महापालिकेच्या माध्यमातून महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक अनिल भगत यांच्यासोबत चर्चा करून महापालिकेच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी तळोजा मजकूर गावाच्या नाल्याचे पक्के बांधकाम करण्यासाठी मंजूर करण्यात आला. त्याचे टेंडरसुद्धा निघाले पावसाळा जवळ आल्याने तळोजा मजकूरमध्ये पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तात्पुरता नाला जेसीबीच्या साहाय्याने खोल करून पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी नाल्याची सफाई करून घेण्यात येत आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी दुपारी तळोजा मजकूर गावाला भेट दिली. सोबत भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, संतोष पाटील, अमर पाटील, मधुकर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.