Breaking News

राज्यात ‘बिगी बिगी’ नको

ठाकरे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ची घोषणा केली असली तरी राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये तरी बहुतांश व्यवहार बंदच राहणार आहेत. हॉटेले आणि मॉल सुरू करण्यासारखी परिस्थिती राज्यात अजिबातच नाही. रुग्णांना रुग्णवाहिन्या व हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्यास मोठ्या अडचणी येत असल्याच्या तक्रारी व व्हिडिओ दिवसाकाठी समाजमाध्यमांवरून पसरत असल्यामुळे तूर्तास सरकारने त्यांची उपलब्धता निर्माण करण्याकडे लक्ष दिलेले बरे. अखेर आपण सारेच गेले दोन महिने ज्या टप्प्याची वाट पाहात होतो तो टप्पा किमान सुरू झाला आहे. चौथ्या लॉकडाऊनचे शेवटचे दोन दिवस उरलेले असताना केंद्र सरकारने ‘अनलॉक इंडिया’ची हाक दिली तर पाठोपाठच इतर अनेक राज्यांसोबतच महाराष्ट्रातही राज्य सरकारची पाचव्या लॉकडाऊनची नवी नियमावली जाहीर झाली आहे. केंद्र सरकारने पाचवा लॉकडाऊन कंटेन्मेंट झोनपुरताच मर्यादित ठेवत थेट हॉटेले व मॉल्स देखील खुले करण्याची परवानगी दिल्याने देशाच्या काही भागांमध्ये जनजीवन काही प्रमाणात पूर्ववत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, महाराष्ट्रात अनेक शहरांत व विशेषत: मुंबई महानगर प्रदेशात कोरोनासंबंधी परिस्थिती गंभीर असल्याने राज्यातील जनता राज्य सरकारच्या नियमावलीकडे डोळे लावून बसली होती. मराठमोळ्या महाराष्ट्रात ‘बिगिन अगेन’ची भाषा करणार्‍यांनी येथील कोरोनासंबंधी परिस्थिती इतकी हाताबाहेर गेल्यानंतर आता तरी आरोग्य सेवा ‘बिगी बिगी’ सुधारली तरी पुरेसे ठरेल. देशभरातील अनेक भागांतील परिस्थिती मात्र महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे. मोदी सरकारने 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून देशव्यापी कठोर लॉकडाऊन पुकारला होता, त्याला एव्हाना 68 दिवस लोटले आहेत. दोन महिन्यांच्या या काळात देशाची अर्थव्यवस्था जवळपास अर्धी अधिक ठप्प राहिली. पण लॉकडाऊनच्या याच काळात कोरोनाबाधितांची संख्या अफाट वेगाने वाढण्याला यशस्वीरित्या अटकाव झाल्याचे तज्ज्ञ मान्य करतात. त्यामुळेच भारत आणि भारतीयांनी आता जनजीवन पूर्ववत करण्याकडे वळण्याचा प्रयास करायला हरकत नाही अशी एक सार्वत्रिक भावना आहे. खरे तर, येत्या आठवड्यात जगभरातील अनेक देशांमध्ये जनजीवन खुले करण्याचा हाच मूड पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी, ग्राहक आणि पर्यटक यांच्या व्यवहारांना पुरेशी खबरदारी पाळून हिरवा कंदिल दाखवण्याचे पाऊल या घटकेला अनेक देश उचलत आहेत. कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या ब्रिटनमध्ये देखील या आठवड्यापासून दुकाने आणि शाळा सुरू होत आहेत. अर्थातच सोशल डिस्टन्सिंगच्या नव्या नियमांसहच हे व्यवहार सुरू होत असून अतिशय कठोर नियमांसह व्यावसायिक क्रीडा व्यवहारांना देखील तिथे मुभा देण्यात आली आहे. तुलनेने खूपच कमी केसेस समोर आलेल्या युरोपातील अन्य काही छोट्या देशांनी तर परस्परांच्या पर्यटकांचेही स्वागत करायचे ठरवले असून ग्रीस यात आघाडीवर आहे. परंतु ब्रिटन आणि स्वीडनसारख्या लक्षणीयरित्या कोरोनाबाधित ठरलेल्या देशांना यातून वगळण्यात आले आहे. भारताने मात्र आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. टप्प्याटप्प्याने भारत अनलॉक होणार आहे. शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय सर्व संबंधितांशी बोलून जुलैमध्ये घेतला जाणार आहे. आपल्याकडचे कोरोना केसेसचे वाढते आकडे पाहता ही सावधगिरी योग्यच आहे. महाराष्ट्रानेही बिगी बिगी बिगीन अगेन न करता खबरदारी घेत पावले टाकलेलीच बरी.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply