पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील प्रभाग क्रमांक 17 मधील गटारे व नाल्यांची साफ सफाई, गाढी नदी लागून असलेली संरक्षण भिंतीचे ऑडिट करुन डागडूजी करणे तसेच मान्सूनपूर्वी उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटणी करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी सिडकोकडे दिले होते. या मागण्यांची दखल घेत सिडको कडून कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नवीन पनवेल येथील प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व सेक्टर मधील दोन्ही बाजूस असलेले गटार व्यवस्थित साफ न केल्याने पाणी व कचर्यामुळे तुंबले होते, परिसरातून ये-जा करणार्या नागरीकांना आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याची बाब निवेदनात मांडली होती.
याच प्रभागात सेक्टर 13 मध्ये गाढी नदीच्या लागून असलेली संरक्षण भिंत दयनीय अवस्थेत असलेल्या संरक्षण भिंतीला तडा जाऊ शकते. या भिंतीचे ऑडिट मान्सून सुरु होण्यापूर्वी तातडीने करणे अत्यंत गरजेचे असल्याचे नगरसेविका वाघमारे यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्याचप्रमाणे नवीन पनवेल मुख्य समोरील रस्त्यावर झाडांच्या उंच फांद्या विद्युत लाईनला स्पर्श होत असल्याने शॉर्ट सर्कीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच उंच व सुकलेल्या फांद्या वाहनांवर पडून नुकसान होण्याची भिती आहे. हे गांभिर्य लक्षात घेता सिडको विभागामार्फत मान्सुन पूर्वी झाडांच्या फांद्या छाटण्यात याव्यात या मागण्यांची दखल सिडको घेऊन कामांस सुरुवात केली आहे.