घराबाहेर न पडण्याचे तहसीलदारांकडून जनतेला आवाहन
मुरूड : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यात प्रशासन सज्ज झाले असून, विशेषत: समुद्रकिनारी असणार्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
कोकण किनार्याला चक्रीवादळाचा धोका आहे. तो लक्षात घेऊन तालुक्यातील समुद्र किनारी असणार्या लोकांची शासकीय शाळा, निवारा शेड व मोकळ्या जागेत राहाण्याची तात्पुरती व्यवस्था केली जात आहे. यासाठी मंडळ अधिकारी विजय म्हापूस्कर हे तलाठीवर्गासोबत समुद्र किनारील गावांत फिरून परिश्रम घेत आहेत.
प्रशासनाने केली तयारी
याबाबत मुरूडचे तहसीलदार गमन गावीत व नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी माहिती देताना सांगितले की, तलाठी वर्ग गावागावात जाऊन चक्रीवादळात लोकांनी कशी दक्षता घ्यावयाची याबाबत कल्पना देत आहे. मुस्लिम लोकांना याची माहिती व्हावी यासाठी मशिदीमधूनसुद्धा जाहीर सूचना देण्यात आली आहे. बुधवारी नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये. प्रशासनास सहकार्य करावे. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
नागोठणे बाजारपेठ आज राहणार बंद
नागोठणे : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर धडकणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 3) नागोठणे बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे.
चक्रीवादळचा धोका नागोठणे शहराला बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी बुधवारी शहरात बंदची हाक दिली असून, दुकानदारांनी दिवसभरात आपली दुकाने उघडू नये तसेच नागरिकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर पडू नये, असे नागोठणे ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.