लंडन : वृत्तसंस्था
पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेला हीरे व्यापारी नीरव मोदी याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लंडनमधील सरकारी यंत्रणेने ही कारवाई केली.
मोदीच्या अटकेमुळे त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू करता येईल, असा विश्वास भारताच्या परराष्ट्र खात्यामार्फत व्यक्त करण्यात आला आहे. न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे नीरव मोदीला 29 मार्चपर्यंत कोठडीत राहावे लागणार आहे.
लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने मंगळवारी (दि. 19) मोदीला हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लंडनच्या सरकारी यंत्रणेने ही कारवाई केली आहे. त्यानुसार मोदीला आता न्यायालयासमोर हजर केले जाईल. मोदी लंडनमधील उच्चभ्रू लोकवस्तीत राहत असल्याची बातमी तेथील एका वृत्तपत्राने दिली होती. तेथून तो आपला हीर्यांचा व्यवसायही चालवत होता. पदपथावरून निवांतपणे फिरतानाही त्याचा व्हिडीओ समोर आला होता.
29 मार्चपर्यंत कोठडीतच!
पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मुख्य आरोपी नीरव मोदी याचा जामीन अर्ज लंडनच्या वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने फेटाळला. त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नीरव मोदीला अटक केल्यानंतर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, तसेच प्रवासाची आणि कर भरल्याची कागदपत्रेही सादर केली होती. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता पुढील सुनावणी 29 मार्चला होणार आहे.