Breaking News

मुरूडमध्ये गाईवर चाकूने वार

फळविक्रेत्याचे कृत्य; गुन्हा दाखल

मुरूड : प्रतिनिधी

मुरूड शहरातील एका फळविक्रेत्याने त्याच्या हातगाडीवरील फळ एका गाईने खाल्याने रागाच्या भरात या गाईच्या पोटात चाकूचा वार केला. ही घटना मंगळवारी (दि. 16) घडली. यामुळे गाय रक्तबंबाळ झाल्याने प्रत्यक्षदर्शी नागरिक क्रोधीत होऊन त्यांनी फळविक्रेत्याला चोप देऊन राग व्यक्त केला आणि तत्काळ मुरूड पोलिसांना बोलावून आरोपीला पोलिसांच्या हवाली केले. या प्रकारामुळे मुरूड शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते, परंतु मुरूड पोलीस ठाण्यातर्फे शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवून वातावरण शांत करण्यात आले.

प्रकार घडताच पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांनी मुरूड पोलीस ठाण्याला भेट देऊन तत्काळ शांतात कमिटीचीसुद्धा मिटिंग घेऊन लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

   याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दुपारच्या वेळेत बाजारपेठ येथील मुख्य नाक्यावर तौफिक बशीर मुजावर हा फळ विकण्याचा धंदा करीत होता. या वेळी दुकानदाराचे लक्ष चुकवून एका गाईने त्याच्या हातगाडीवरील फळे खाल्ली. याचा राग धरून संबंधित माणसाने रागाच्या भरात गाईवर चाकूने वार केला. हा वार गाईच्या पोटावर खालील बाजूस वर्मी लागल्याने गाईच्या पोटातून रक्त वाहू लागले. हा प्रकार ज्यांना माहीत पडला त्यांनी या दुकानदारावर चांगलाच राग व्यक्त करून त्याला पोलिसांच्या हवाली केले.

या आरोपीवर मुरूड पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 428 ,429 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 व त्याचप्रमाणे प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देणे अधिनियम कलम 11 (1) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, जखमी गाईला तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन तिच्यावर तातडीने इलाज करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पवार यांनी सांगितले की, गाईला तीन टाके पडले असून, तिची तब्ब्येत सुस्थित आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply