Breaking News

‘ही तर नुसती सुरुवात, एकच भाग बाहेर आलाय’; देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान

पुणे ः प्रतिनिधी

एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. आता तर नुसती सुरुवात झाली आहे. एकच भाग बाहेर आला आहे. दुसरा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे फडणवीसांनी म्हटले. पत्रकरांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ज्या वेळी याचे काही पुरावे माझ्याजवळ आले, त्या वेळी मी ते सभागृहात यासाठीच मांडले की समजा पोलिसांमधीलच लोक अशा प्रकारे काम करणार असतील आणि अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होणार असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील? म्हणून हा सगळा विषय मी सातत्याने मांडत होतो, पण दुर्दैवाने राज्य सरकारच्या वतीने केवळ त्यांना पाठीशी घालण्याचे काम सातत्याने होत होते. कुठेतरी त्यांची वकिली करण्याचे काम हे सरकारच्या वतीने सातत्याने होत होते. आती जी एनआयएची कारवाई झाली आहे, त्यामध्ये अनेक पुरावे एनआयएला मिळाले आहेत. कशा प्रकारे हा संपूर्ण गुन्हा घडला हेदेखील समोर आले आहे. फडणवीस यांनी पुढे सांगितले की, हे प्रकरण केवळ सचिन वाझे यांच्यापुरते मर्यादित नाही. कोण कोण यामध्ये आहेत? कोणाचा याला पाठिंबा आहे? कुणी कुणी या प्रकरणात काय काय भूमिका निभावली आहे? या सर्व गोष्टी बाहेर येणे आवश्यक आहे. मला असे वाटते आता ही नुसती सुरुवात झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी हाही उपस्थित होतो की सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित होते. ज्या वेळी मी मुख्यमंत्री होतो आणि माझ्याकडे गृहखाते होते, त्या वेळी शिवसेनेच्या नेत्यांनी आग्रह धरला होता की त्यांना पुन्हा सेवेत घेतले पाहिजे. म्हणून त्या वेळी मी अ‍ॅडव्होकेट जनरल यांना बोलावून ती फाइल दाखवली होती आणि तेव्हा मला असा सल्ला दिला गेला होता की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने ते निलंबित झालेले असल्याने त्यांना घेणे योग्य होणार नाही. तो उच्च न्यायालयाचा अपमान होईल, मात्र हे सरकार आल्यानंतर त्यांनी कोरोनाचे कारण दाखवून त्यांना पुन्हा सेवेत घेतले. क्राइम इंटलिजन्स युनिट हे मुंबई पोलिसांचे सगळ्यात महत्त्वाचे युनिट आहे. या युनिटचा प्रमुख नेहमी एक पोलीस निरीक्षक दर्जाचा व्यक्ती असतो. यांना घेतल्यानंतर रातोरात पोलीस निरीक्षक दर्जाच्या व्यक्तीची बदली करण्यात आली आणि एपीआय दर्जाचे जे सचिन वाझे आहेत त्यांना त्याचा पूर्ण चार्ज देण्यात आला. त्यानंतर मुंबईमधील कुठलीही केस असो ती प्रत्येक केस ही त्यांच्याचकडे जाईल अशा प्रकारचे त्या ठिकाणी काम सुरू झाले आणि म्हणून त्यांचे जे वाढते महत्त्व होते, सरकारचा जो वाढता पाठिंबा होता किंवा जो सरकारचा वाढता विश्वास त्यांच्यावर होता तो ते शिवसैनिक होते म्हणून होता की काय कारण होते मला माहिती नाही, परंतु या विश्वासामुळे त्यांना असे लक्षात आले की आपण काहीही करू शकतो आणि अशा या मानसिकतेमधून हे काम झाले आहे. हे फार गंभीर आहे. या संदर्भात अजून पुढे भरपूर कारवाई होण्याची अपेक्षा आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

माझे मत असे आहे की, अजून यातला एकच भाग बाहेर आलेला आहे. दुसरा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मनसुख हिरेन यांची जी हत्या झाली आहे, आता तर ही गाडी त्या ठिकाणी ठेवल्याचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याच्या संदर्भात एनआयएने रिमांड मागितला आहे, परंतु मनसुख हिरेन हत्या प्रकरणदेखील महत्त्वाचे आहे. त्यामध्येही प्रचंड मोठे धागेदोरे आणि पुरावे तपास यंत्रणांना उपलब्ध होत आहेत. त्यामध्येही लवकरच कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply