Breaking News

कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांची अर्थात कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
पनवेल तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. पनवेलमध्ये आढळून येणारे बहुतांश रुग्ण हे मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे लोक आहेत. या कर्मचार्‍यांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था कामाच्या ठिकाणी करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती व आंदोलनाचा इशाराही दिला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलन पुकारल्यानंतर मुंबई महापालिकेने बाहेरून येणार्‍या कर्मचार्‍यांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था करण्याचे आदेश पारित केले होते व रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही तसे आश्वासन दिले होते, परंतु वारंवार मागणी करूनही शासनाने दुर्लक्ष केले आणि मुंबई महापालिकेचा आदेश कागदावरच राहिला.
पनवेल तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईमध्ये अत्यावशक सेवा देणारे कर्मचारी कोरोना संक्रमित तर होतच आहेत आणि शिवाय त्यांच्यामुळे आता त्यांच्या परिवारातील सदस्यांनादेखील हा संसर्ग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांची तात्पुरत्या स्वरूपात कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. या जनहित याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी होणे अपेक्षित आहे. जर मुंबई उच्च न्यायालयाने आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी मान्य केली, तर पनवेल परिसर कोरोना संक्रमणमुक्त होण्यास फार मोठा हातभार लागणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply