कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत तालुक्याला मागील आठवड्यात कोरोनाने विळखा घातला होता. त्यामुळे सतर्क झालेल्या प्रशासनाला सलग तीन दिवस मोठा दिलासा मिळाला असून यादरम्यान केवळ एक नवीन रुग्ण आढळून आला आहे, मात्र या वयस्कर महिला रुग्णाचा नुकताच मृत्यू झाला. तालुक्यातील तब्बल 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आजघडीला 13 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
कर्जत तालुक्यातील शहरी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मे महिन्याच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्यात एकट्या कर्जत शहरात 10, तर माथेरान शहरात सहा रुग्ण आहेत. ग्रामीण भागात 12 रुग्ण होते. मंगळवारपर्यंत 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे पनवेल, कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय आणि इंडिया बुल्स कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. एकूण 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी नऊ रुग्ण हे कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
तीन वयोवृद्ध रुग्णांना कोरोनासह अन्य व्याधी असल्याने त्यांचे बळी गेले आहेत, मात्र मागील तीन दिवसांत केवळ एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कर्जत तालुक्यात आढळल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. कर्जत शहरातील सुयोगनगर येथे शेवटचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे, मात्र आधीपासूनच ही महिला रुग्ण आजारी होती.