मुंबई : प्रतिनिधी
पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर द्या, अशी मागणीही होते आहे. या हल्ल्याची फक्त राजकीय नेत्यांनीच नाही; तर खेळाडूंनीही कठोर शब्दांत निर्भत्सना केली आहे. अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही या भ्याड हल्ल्याचा ट्विटरच्या माध्मातून तीव्र निषेध केला आहे. जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी गुरुवारी (दि. 14) दुपारी आयईडी बॉम्बच्या साहाय्याने सीआरपीएफच्या 2500 जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला. यात सुमारे 40 जवान शहीद; तर काही जखमी झाले आहेत. या हल्ल्याविरोधात सोशल मीडियावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे शहीदांना श्रद्धांजलीही वाहण्यात येते आहे. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सहवाग याने या हल्ल्यामुळे आपण प्रचंड दुःखी असल्याची भावना व्यक्त केली आहे. त्याने शहिदांना श्रद्धांजली वाहिली, तसेच जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थनाही केली आहे. सुरेश रैना आणि शिखर धवन या दोघांनीही या हल्ल्याचा निषेध करून मृतांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज हिनेही या हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘भारतासाठी हा दुखवट्याचा दिवस आहे. कोणाला हवे आहे? या हल्ल्याला कोण पाठिंबा देतेय? आपण चोख प्रश्न विचारून योग्य उत्तरे मिळवण्याची नितांत गरज आहे,’ असे ट्विट तिने केले आहे. ऋषभ पंत, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, हरभजन सिंह आणि इतर खेळाडूंनीही शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. सर्वात तीव्र निषेध केला आहे क्रिकेटपटू गौतम गंभीर याने. ‘चला फुटीरतावाद्यांशी बोलू या. चला पाकिस्तानशी बोलू या, पण ही चर्चा टेबलवर नाही; तर युद्धभूमीवर करू या’ अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.