Breaking News

चक्रीवादळाने रसायनीत नुकसान

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनीत निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (दि. 3) साडेअकरा वाजल्यानंतर रौद्ररुप धारण करून सर्वत्र होत्याचे नव्हते केले. सोसाट्याच्या वादळ वार्‍याबरोबर पावसानेही रौद्र रूप धारण केल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सायं साडेपाच वाजेपर्यंत निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसल्याने चांभार्ली ते मोहोपाडा रस्त्यासहलगतची व इतर परिसरातील झाडे उन्मळून पडल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. तसेच वीजवाहिन्यांवर जुनाट वृक्ष उन्मळून पडल्याने परीसरातील काही गावात वीजपोलही झुकल्याचे दिसून आले.

गावोगावात घरांवरील कौले, सिमेंटचे पत्रे, लोखंडी शेड उडाल्याने अनेकांची संसारे उघड्यावर पडली. यात रसायनी परिसरातील शिवनगर गावाला इतर गावांपेक्षा जास्त चक्रीवादळाचा तडाखा बसला. शिवनगरमधील  रमेश राऊत, नारायण फालके, संजय श्रीवास्तव, नथुराम राऊत यांच्या घरांवरील पत्र्यासह लोखंडी शेड सोसाट्याच्या वार्‍यावर उडाले तर चंद्रकांत राऊत, वनेश गायकवाड, राकेश खराडे, महादेव कोडींलकर, गणपत धुरव, शिवनगर गणेश मंदिर आदी सिमेंट पत्रे वार्‍याच्या प्रवाहालगत उडाले. तसेच प्रविण सोमासे यांच्या घरावर जुनाट वृक्ष कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले व शांताराम भंडारकर यांच्याही शेडवर वृक्ष पडून नुकसान झाले. शिवनगरच्या इतर भागातही चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वेळी महिला वर्गाच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आल्याचे विदारक चित्र शिवनगरमध्ये पहावयास मिळाले. तसेच मोहोपाडा येथील नारायण कुरंगले, तुलशीराम गायकवाड, राजेश कुरंगले यांच्या पत्राशेड, तसेच पत्रे कोसळून वीज उपकरणांसह इतर वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर प्रतिक साळुंके, म्हात्रे, बताले यांच्या ही घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. तर रिस कांबा, चांभार्ली, पानशिल, तळेगाव, आंबिवली, रिस नविन वसाहत आदी परिसरात चक्रीवादळाने मोठे नुकसान झाल्याचे समजते.

सतत पाच तासापेक्षा जास्त सुरू राहिलेल्या वादळाने सर्वत्र हाहाकार माजविला. त्यातच अनेकांच्या घराची कौले उडून घरे भुईसपाट झाल्याचे दृश्य ही पहावयास मिळाले. मात्र या संकटाने अनेकांची संसारे उघड्यावर पडल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान पावसाने तर आता जोरदार सुरुवात केली आहे. मात्र आता या आर्थिक संकटातून कधी बाहेर निघणार, अशी चिंता आता अनेकांना पडली आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रसायनी पाताळगंगासह तालुक्यातील विविध भागात बसला असून अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. या वेळी दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत नुकसान पंचनामे होणार असल्याचे शासकीय अधिकार्‍यांनी बोलताना सांगितले.

परिसरात ठिकठिकाणी वृक्ष वीजवाहिन्यावर पडल्याने शिवाय विजपोलही झुकल्याने विजपूरवठा पुर्ववत सुरू होण्यास वेळ जाणार असून वीजकर्मचारी परिश्रम घेत आहेत.

-किशोर पाटील, उप अभियंता, वीज कार्यालय, मोहोपाडा

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply