कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका गृहसंकुलाच्या सदनिकेत राहणार्या वयस्कर महिलेचा बाथरूममध्ये पडून मृत्यू झाला आहे. सुशीला रफायल पगारे (वय 65) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांचा मृत्यू नक्की बाथरूममध्ये पडून की अजून कोणत्या कारणाने झाला याचा तपास नेरळ पोलीस करीत आहेत. सुशीला पगारे नेरळ येथे एकट्याच राहत होत्या. त्या अनेक आजारांशीही झुंजत होत्या. इमारतीत साफसफाईचे काम करणारा कर्मचारी बुधवारी सकाळी गेला असता, पगारे यांच्या घराचा दरवाजा उघडाच असलेला त्याला दिसला. त्याने आत जाऊन पाहिल्यावर पगारे या बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. याबाबत सफाई कर्मचार्याने तत्काळ नेरळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून, अधिक तपास सुरू आहे.