Breaking News

तळोजा एमआयडीसीतील व्हीनस कंपनीचे मास्क देशभरात

पनवेल : बातमीदार

कोरोनाचा प्रसार थांबविण्याचे महत्त्वाचे काम करणार्‍या मास्कचे पनवेलमधील तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हीनस कंपनीत कोरोनाच्या काळात मास्क बनविण्याचा वेग तिपटीने वाढविला असून दररोज तेथे चार लाख मास्क बनविले जात आहेत.जर्मनी, इस्रायल, अमेरिका, स्पेन, न्युझिलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया, मलेशिया यांच्यासह मिडल इस्ट भागातील ऑइल कंपन्यांमध्ये तळोजातील व्हीनस कंपनीत बनविलेला मास्क वापरला जातो. या देशांनी व्हीनस कंपनीच्या मास्कला चांगला दर्जा दिला असून 20 वर्षांपासून ही कंपनी या देशांना मास्कचा पुरवठा करते. व्हीनसमधील एकूण उत्पादनांपैकी 40 टक्के उत्पादन केवळ या देशात विकले जाते. या कंपनीने कोरोनाच्या काळात आपल्या देशासाठी कोट्यवधी मास्कचे उत्पादन केले. पंधराशे कामगारांसह ही कंपनी लॉकडाऊनपूर्वी रोज 75 ते 90 हजार मास्कचे उत्पादन करीत होती. कोरोनाच्या काळात लॉकडाउननंतर निर्यातबंदी असूनही ही कंपनी सध्या दररोज सुमारे चार लाख मास्कचे उत्पादन करीत आहे. सध्या कंपनीत पाच हजार कामगार काम करीत आहेत. कंपनीचे सर्वाधिक मास्क हे केंद्र सरकारसाठी उत्पादित केले जात आहेत. साडेतीनशे प्रकारचे मास्क करणार्‍या कंपनीतील मास्कचा दर्जा अत्यंत चांगला असून गेल्या 20 वर्षांत विदेशातील एकही ग्राहक गमावला नसल्याचे कंपनी व्यवस्थापन सांगते. व्हीनसच्या बरोबरीने पुण्यात थ्रीएम ही कंपनी मास्कचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करते. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने केलेल्या सहकार्यामुळे देशात आता शंभरहून अधिक कंपन्या मास्कचे उत्पादन करू लागल्या आहेत. पूर्वी मास्कचे उत्पादन करणार्‍या केवळ सहा ते सात कंपन्या होत्या. लॉकडाउनमुळे घरातून बाहेर पडणे शक्य नसलेल्या वेळेत जिल्हा प्रशासनाने कंपनीला मास्क उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. काम मागण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला रोजगार देण्याचा निर्णय घेऊन कंपनीने कोरोनाच्या काळात प्रशिक्षण देऊन कामगार घडवले. कठीण काळात अनेक विद्यार्थीही कंपनीत काम करीत होते. कोरोनाच्या काळात कामगारांना किमान वेतनापेक्षा दुप्पट पगार देऊन काम सुरू ठेवले. कंपनीत 75 टक्के महिला काम करीत असून रात्रपाळीत पुरुष काम करतात.

आम्ही कोणत्याही एजन्सीच्या मध्यस्थीशिवाय राज्य सरकार, केंद्र सरकार, महापालिका, सरकारी, खासगी रुग्णालयांना मास्कची थेट विक्री केली. त्यामुळे आम्हाला कमी किमतीत मास्क देता आले. यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाचे चांगले सहकार्य लाभले. -महेश कडूस, व्यवस्थापकीय संचालक, व्हीनस मास्क कंपनी

Check Also

चित्रपटाचे यश अन् सेलिब्रेशन

चित्रपट सुपर डुपर हिट होण्यातील सर्वात महत्त्वाचा घटक अर्थात प्रेक्षक. या प्रेक्षकांना चित्रपट आवडला रे …

Leave a Reply