Breaking News

बर्ड फ्लूमुळे खवय्यांची मासळीला पसंती

ग्राहकांची चिकन खरेदीकडे पाठ; मासळी बाजारात गर्दी

पनवेल ः वार्ताहर

नव्याने संक्रमित होत असलेल्या बर्ड फ्लू संसर्गाच्या चर्चेमुळे पनवेल परिसरातील ग्राहक कोरोनाची भीती विसरल्याचे चित्र पनवेल परिसरातील मासळी बाजारात उसळलेल्या गर्दीमुळे पाहायला मिळत आहे. हवामानात झालेल्या बदलामुळे मासळीचे दर वाढले असूनही मासळी खरेदीसाठी खवय्यांनी केलेल्या गर्दीमुळे अनेक दिवसांनंतर मासळी विक्रेत्यांना अच्छे दिन पाहायला मिळाल्याची माहिती कळंबोली येथील मासळी विक्रेते बिपीन परशे यांनी दिली.

हवामानात झालेला बदल आणि कमी प्रमाणात करण्यात येत असलेल्या मासेमारीमुळे माश्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी मागील काही दिवसांत खवय्यांनी मासे खरेदीकडे पाठ फिरवत चिकन खरेदीला प्राधान्य दिले होते. खवय्यांकडून मिळणार्‍या प्रतिसादामुळे परिसरातील चिकन विक्रेतेदेखील काही प्रमाणात सुखावले होते. कोरोना काळात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या चिकन विक्रेत्यांना अनलॉकदरम्यान ग्राहकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त केले जात होते, मात्र अचानक उद्भवलेल्या बर्ड फ्लूमुळे परिसरातील खवय्यांनी चिकन खरेदीकडे पाठ फिरवत महाग झालेल्या मासे खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे पनवेल परिसरातील मासळी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. बाजारपेठेत झालेल्या गर्दीमुळे नागरिकांमधील कोरोनाची भीती संपुष्टात आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

माश्यांच्या दरात वाढ

हवामानात झालेल्या बदलावामुळे मासे मिळणे अवघड झाल्याने कमी प्रमाणात मासे बाजारात उपलब्ध होतात. परिणामी किरकोळ बाजारात माश्यांच्या दरात वाढ झाली असून, काही दिवसांपूर्वी 150 रुपये किलो दराने मिळणारे बोंबील 200 रुपये किलोने विकले जात आहेत. 200 रुपये किलो दराने विकला जाणारा बांगडा 250 रुपये किलो, 450 रुपये किलो दराने विकली जात असलेली छोटी सुरमई 600 रुपये, 650 रुपये किलोची मोठी सुरमई 800 रुपये, तर 600 रुपये किलो दाराने विक्री होणारे पापलेट 800 रुपये आणि 400 रुपये किलो दराने विकली जाणारी कोळंबी 500 रुपये किलो दराने विकली जात आहे.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply