Breaking News

नुकसानग्रस्तांना भरीव मदत करून दिलासा द्या!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

अलिबाग ः प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 11) निसर्ग चक्रीवादळात प्रचंड नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड तसेच श्रीवर्धन तालुक्यातील वादळग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी श्रीवर्धन येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित केले. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने जी घरे पूर्णतः पडली त्यांच्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेली दीड लाखांची मदत अत्यंत तुटपुुंजी आहे. सरकारने सर्व नुकसानग्रस्तांना भरीव मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.    पंतप्रधान आवास योजना व सरकारची मदत यांचा एकत्रित लाभ दिल्यास वादळात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना आधार मिळेल, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मागील नऊ दिवसांत कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. निसर्ग चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. जिथे नुकसानग्रस्तांना ठेवले आहे त्या भागाची अवस्था खुराड्यासारखी आहे. अनेकांचे हाल होत आहेत. सर्वांत आधी त्या लोकांची राहण्याची सोय योग्य पद्धतीने केली पाहिजे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
निसर्ग चक्रीवादळात फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. पडलेली झाडे कापून बाहेर काढावी लागणार आहेत. यासाठी मोठा खर्च येणार आहे. कोकणात जमीन धारणा क्षेत्र कमी असल्यामुळे सरकारने  जाहीर केलेली हेक्टरी 50 हजारांची मदत तुटपुंजी आहे.  पुढील अनेक वर्षे त्यातून उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने योग्य मदत जाहीर करावी. कोकणाला कर्जमाफीचा विशेष लाभ होत नाही, परंतु या वेळची स्थिती पाहता शेतकर्‍यांची चालू कर्जे माफ करावीत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मच्छीमारांचेही मोठे नुकसान झाले, परंतु सरकारच्या पॅकेजमध्ये त्यांचा विचार झाल्याचे दिसत नाही. आर्थिक संकटात अडकलेल्या मच्छीमारांनाही सरकारने मदत करून दिलासा द्यावा. येथील पर्यटन व्यवसायालाही चक्रीवादळाचा फटका बसला असून या व्यवसायाशी संबंधित नुकसान झालेल्या लोकांना शासनाने मदत करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते आदी उपस्थित होते.
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची घेतली भेट
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागाव येथे निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त बागायतींची पाहणी केली तसेच शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply