पनवेल : बातमीदार – चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला 30 वर्षीय आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या आरोपीच्या संपर्कात आलेल्या तळोजा पोलीस स्टेशनमधील पोलिसांसह वकिलपत्र स्वीकारलेल्या आरोपीच्या वकिलाचीही तारांबळ उडाली आहे. संबंधित आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यावर संपर्कातील 15 पोलीस कर्मचारी आणि वकील यांना क्वारंटाइन व्हावे लागले आहे.
7 जून रोजी चोरीच्या गुन्ह्यात एका आरोपीला तळोजा पोलिसांनी अटक केली होती. दुसर्या दिवशी 8 जून रोजी या आरोपीला पनवेलमधील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात दाखल करण्यापूर्वी आरोपीचे मेडिकल करण्यात आले व रिपोर्ट आल्यानंतर त्या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित आरोपीला ऑनलाइन जामीन देऊन थेट पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यानंतर आरोपीच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी दिली. दरम्यान, आरोपीचे वकीलपत्र स्वीकारलेले वकील सुद्धा क्वारंटाइन झाले आहेत.