चित्रकार पराग बोरसे यांची बांधिलकी
कर्जत : बातमीदार – येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांनी काढलेल्या एका निसर्ग चित्राची विक्री केली असून, यातूून जमा आलेले 50 हजार रुपये त्यांनी माथेरानमधील शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात दिली आहे. लॉकडाऊन काळात मदत व्हावी म्हणून दाखवलेल्या या बांधिलकीबद्दल बोरसे यांचे माथेरान या त्यांच्या आजोळ गावी कौतुक होत आहे.
माथेरानमधील निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या पराग बोरसे यांचे चित्रकलेत आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव झाले आहे. आजोळी वाढलेल्या आणि या मातीशी जुळलेल्या घट्ट नात्यामुळेच इथल्या सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच भेडसावत असलेल्या एकंदरीत परिस्थितीची बोरसे यांना जाणीव आहे. याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी बोरसे यांनी आपल्याजवळील असणारी चित्रे फेसबुकवर पोस्ट करून त्यातील चित्राची विक्री केल्यावर मिळणारी रक्कम ही माथेरानसाठी देणगी स्वरूपात देण्याबाबत आवाहन केले होते. सोशल मीडियावरील आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील बोरिवली येथील कलाप्रेमी विवेक माणगावकर यांनी एक चित्र विकत घेतले आणि ठरल्याप्रमाणे बोरसे यांनी चित्र विकून जमा झालेली 50 हजार रुपयांची रक्कम कोरोना संकटामुळे हलाखीची परिस्थिती निर्माण झालेल्या माथेरानमधील विद्यार्थ्यांच्या उपयोगात त्यांनी आणली आहे.
बोरसे यांनी 50 हजार रुपयांपैकी 25 हजार रुपये माथेरान प्रतिष्ठानकरिता दिले, तर इयत्ता चौथी ते दहावीपर्यंत शिकणार्या एकूण 25 गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी दिले. या मुलांसह पालकांच्या चेहर्यावर आनंद दिसून आला.