Breaking News

‘वेदांता-फॉक्सकॉन’चा प्रकल्प मविआ सरकारमुळे गुजरातमध्ये

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

मुंबई : प्रतिनिधी
वेदांता समूह आणि फॉक्सकॉन कंपनी यांचा प्रकल्प पूर्वी सत्तेत असणार्‍या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला असल्याचे म्हणत विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
वेदांता समूह आणि ‘फॉक्सकॉन’च्या भागीदारीतून होऊ घातलेल्या एक लाख 66 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प गुजरातमध्ये साकारणार आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि. 13) यावर प्रतिक्रिया देत पूर्वी सत्तेत असणार्‍या महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखविले आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमच्या शिवसेना-भाजप सरकारला दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांता समुहाचे मालक अनिल अग्रवाल यांच्याबरोबर बैठक घेतली. या बैठकीत उपमुख्यमंत्री, कंपनीचे प्रमुख संचालक उपस्थित होते. या प्रकल्पासाठी पुण्यातील तळेगावजवळ 1100 एकर जमीन आम्ही देऊ केली होती. सरकार आपल्याला ज्या काही सवलती आहेत त्या निश्चित देईल, असेही कंपनीला सांगण्यात आले होते, पण त्याआधी गेली दोन वर्षे त्यांना ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळायला हवा होता तो कमी पडला असावा असे सांगत हा प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आधीच्या महाविकास आघाडीला जबाबदार धरले आहे.
राजकारणातील वाईट प्रवृत्ती वाढतेय -ना. उदय सामंत
ठाणे : आता दोन महिन्यांत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आहे. त्यामुळे वाईट झाले तर सगळे खापर त्यांच्यावर फोडायचे आणि चांगले झाले तर आमच्यामुळे झाले म्हणायचे ही राजकारणातील वाईट प्रवृत्ती वाढीस लागली आहे. याचा मी जाहीरपणे निषेध करतो, असा पलटवार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
वेदांता समूह आणि फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी आठ ते नऊ महिन्यांपासून प्रयत्न करतोय. दोन महिन्यांपूर्वी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर वेदांता कंपनीला आणखी काही जास्तीच्या सवलती देता येतील का याबाबत अनेक बैठका झाल्या. एवढेच नाही तर वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: बोलले होते. इतर राज्यांच्या तुलनेत आणखी काही द्यायचे असेल तर महाराष्ट्र द्यायला तयार आहे, अशी भूमिका त्यांची होती, पण मागच्या सात ते आठ महिन्यांत त्यांना जो अनुभव आला त्यामुळे कदाचित त्यांनी गुजरातला प्रकल्प नेण्याचा निर्णय घेतला असावा, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
उगीच दुसर्‍यांवर खापर फोडण्यापेक्षा राजापूर रिफायनरीचे तुम्ही काय करणार आहात याचे उत्तरदेखील महाराष्ट्राला द्यावे. फक्त टीका करायची आणि रिफायनरीच्या बाबतीत खासदारांना विरोध करायला सांगायचा, दुटप्पीपणा करायचा हे सर्व महाराष्ट्राच्या समोर आहे. ‘वेदांता-फॉक्सकॉन’चा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलले. हा प्रकल्प गुजरातला गेला असला तरी याच तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ आणि युवा पिढीला जो रोजगार अपेक्षित आहे तो उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिल्याचेही उद्योगमंत्री ना. सामंत यांनी सांगितले.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply