पनवेल ः वार्ताहर
मुंबई बसमालक संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई बसमालक संघटना, बस ओनर्स सेवा संघ आणि स्कूल अॅण्ड कंपनी बस ओनर्स असोसिएशनच्या संघटनेमार्फत बोरिवली येथील एकसर गाव लिंक रोडवर नुकतेच राज्य सरकारविरोधात मूक आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात अध्यक्ष दीपक नाईक, सचिव हर्ष कोटक, रायगड जिल्ह्याचे समीर माखेजा, पालघर जिल्ह्याचे विनोद मेनन, ठाणे जिल्ह्याचे राजेंद्र पाटील, राजेश पुजारी यांच्यासह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. सक्तीच्या लॉकडाऊनचा पंधरवडा उलटल्यानंतरही सरकारकडून दिलासा मिळत नसल्याने वाहतुकीच्या क्षेत्रातील कर्मचार्यांना संघर्ष सुरूच ठेवावा लागत आहे. एका वर्षासाठी करमाफी आणि डिसेंबरपर्यंत प्रवासी वाहनांना टोलमाफी या प्रमुख मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणात मुंबईसह रायगड, ठाणे व परिसरातील बसमालकांनी एकत्र येऊन हे मूक आंदोलन उभारले होते.
सरकारने वाहतूक क्षेत्राला दिलासा दिला नाही तर खासगी बस आरटीओकडे जमा करण्याचा इशाराही संघटनेने दिला. सरकारला अनेक निवेदने देऊनसुद्धा त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे आंदोलन हाती घेतल्याचे दीपक नाईक यांनी सांगितले. मुंबई महानगर क्षेत्रात खासगी व्यवसायातून तब्बल दीड लाखांच्या वर लोकांना रोजगार मिळतो, तर साडेचार लाख लोकांचे जीवन या व्यवसायावर अवलंबून आहे. तसेच संपूर्ण राज्यात 15 लाख लोक या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतात. खासगी वाहतूकदारांचा व्यवसाय बंद पडल्याने राज्याचे सरासरी 500 कोटी रुपये प्रतिमहिना नुकसान झाले आहे. सरकारने येत्या 10 दिवसांत वाहतूकदार व्यावसायिकांना मदत केली नाही, तर आम्ही सर्व बसेस आरटीओमध्ये जमा करू, असा इशारा संघटनेचे सचिव हर्ष कोटक यांनी दिला आहे.
वाहन कर एक वर्षासाठी माफ करावा, ज्यांनी आगाऊ कर भरला आहे त्यांना पुढील कर समांतर करून द्यावा, प्रवासी वाहनांना डिसेंबरपर्यंत टोल शुल्क माफी करावी, सार्वजनिक प्रवासी वाहनांना पार्किंग सुविधा शासनातर्फे देण्यात यावी, तसेच पार्किंग शुल्क माफ करावे, वाहन विम्याचा कालावधी लॉकडाऊन संपेपर्यंत वाढवून देण्यात यावा व आगाऊ भरलेला विमा पुढील कालावधीत समाविष्ट करावा, वाहतूकदारांच्या कर्जाला रिझर्व्ह बँकेने जी मुदतवाढ दिली आहे त्यावरील व्याज माफ करावे तसेच खासगी बसमालकांना प्रतिपरवाना 50 हजार रुपये आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशा मुख्य मागण्या असल्याची माहिती रायगड जिल्ह्याचे बसमालक समीर माखेजा यांनी दिली. हे आंदोलन करताना सोशल डिस्टन्सिंगचा काटेकोरपणे अवलंब करण्यात आाला.