कर्जत : प्रतिनिधी
लॉकडाऊन जाहीर होऊनसुद्धा कर्जत बाजारपेठेत नागरिकांची गर्दी असते. शहरात दिवसातून चार-पाच वेळा वाहतूक कोंडी होते. गेल्या आठवड्यात सर्वात जास्त म्हणजे 432 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तालुक्यात आढळले तरीही नागरिक किरकोळ खरेदीसाठी बिनधास्तपणे बाजारपेठेत गर्दी करतात. त्यांना आवर घालावा म्हणून पोलिसांनी कर्जत चारफाटा आणि श्रीराम पुल चौकात नाकाबंदी सुरू केली आहे. कर्जत तालुक्यात गेल्या आठवड्यात रविवारी एका दिवसात 94 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर गेल्या आठवडाभरात 432 रुग्ण सापडले. गेल्या वर्षी याच दिवसात कमी रुग्ण होते, तरी रस्त्यांवर शुकशुकाट होता. या वर्षी नागरिकांच्या मनात कोरोनाबद्दल भीती नाही, असे बाजारातील गर्दी बघितल्यावर वाटते. जीवनावश्यक सेवा सुरु असल्याने नागरिक बिनधास्तपणे बाजारपेठेत खरेदीसाठी फिरत असतात. अगदी दोनचाकी सोडा चारचाकी वाहने घेऊन येत असल्यामुळे कर्जत बाजारपेठे दिवसातून चार-पाच वेळातरी वाहतूक कोंडी होते. त्यातच लसीकरण सुरू आहे. ते शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात असल्याने लस घेणारांची गर्दी होत असते. तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी याच उपजिल्हा रुग्णालयात असल्याने त्यांच्या नातेवाईकांची गर्दीसुद्धा त्या परिसरात होत असते. या लॉकडाऊनबाबत नगर परिषदेकडून ध्वनिक्षेपकावरून सातत्याने सूचना देण्यात येत आहेत. तरीही नागरिकांची गर्दी होत असते. कोरोना बधितांच्या कुटुंबातील अन्य व्यक्तीसुद्धा खरेदीसाठी बिनधास्तपणे येत असतात. काही बाधितसुद्धा ’मला काहीच होत नाही’ असे सांगून गर्दीत येत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. ही गर्दी रोखण्यासाठी पोलिसांनी कर्जत शहराचे प्रवेशद्वार असलेल्या चारफाटा आणि श्रीराम पुलाच्या चौकात नाकाबंदी सुरू केली आहे. या नाकाबंदीने शहरातील गर्दीमध्ये चांगलाच फरक पडला आहे. कर्जत तालुक्यात कोरोना बधितांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे गर्दी. शासनाने सोहळे, समारंभ करण्यासाठी अनेक निर्बंध आणले आहेत. मात्र ते बासनात गुंडाळून ठेऊन तालुक्यातील अनेक हळदी समारंभ, लग्न सोहळ्यांना चार-पाचशे जणांची गर्दी होती. गेल्या पंधरा दिवसात अनेक विवाह सोहळे झाले, वाढती कोरोना रुग्णसंख्या हे त्याचे फलित आहे. असे समारंभ परवानगी शिवाय होऊ देऊ नयेत तसेच तेथे पोलीस कर्मचार्याची उपस्थिती राहिल्यास निर्बंधांचे पालन होईल. कर्जत तालुक्यात पन्नास किंवा पंचवीस व्यक्तींच्या उपस्थितीत किती लग्न सोहळे झाले, हा एक संशोधनाचा विषय आहे.