निसर्ग चक्रीवादळानंतर शाळा दुरुस्तीसाठी पत्र्यांची कमतरता
पाली : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यातील जवळपास तेराशेहून अधिक जिल्हा परिषद शाळा तसेच अनेक माध्यमिक व खाजगी शाळांचे अतोनात नुकसान झाले आहे. शाळा दुरुस्तीच्या कामांना वेग आला असला तरी शाळांचे छप्पर बसविण्यासाठी ठिकठिकाणी पत्र्यांचा तुटवडा असल्याने कुणी पत्रे किंवा कौले देतो का, अशी हाक देण्याची वेळ मुख्याध्यापक, शिक्षक व ग्रामस्थांवर आली आहे. घरे, वाडे, टेरिसवरील पत्रे उडाल्याने ऐन पावसाळ्यात पत्रे खरेदीसाठी झुंबड उडाली. अशातच लॉकडाऊनमध्ये पत्रे मिळणे कठीण झाले.
निसर्गच्या तडाख्यात घरे आणि इमारतींबरोबरच शाळांची हानी झाली. शाळा इमारती, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, स्वच्छतागृह आदींचे पत्रे उडाले. भिंती कोसळल्या, अनेक शाळांवर झाडे उन्मळून पडली. ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांना घेऊन मुख्याध्यापक व शिक्षक शाळा दुरुस्तीच्या कामी गुंतले आहेत, तर काही जण इतर ठिकाणाहून मदत मिळविण्यासाठी फिरत आहेत, मात्र जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पत्रे व कौलांचा तुटवडा असल्याने शाळेचे छप्पर बसवावे कसे, याची चिंता मुख्याध्यापक व शिक्षकांना लागली आहे. ठिकठिकाणी पत्रे मिळण्यासाठी ते भटकत आहेत.
नवीन पत्रे आले तरी घरे व इमारती दुरुस्तीसाठी हे पत्रे नेले जात असल्याने शाळांना मात्र वाट पहावी लागत आहे. शासनाने जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तोपर्यंत जर शाळांवर छप्पर चढले नाही तर मुले धडे कुठे बसून गिरवणार, असा प्रश्न शिक्षकांसह पालकांनादेखील पडला आहे. त्याचप्रमाणे शाळेतील पुस्तके, संगणक, दस्तऐवज व इतर सामान देखील भिजण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच शाळांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
पत्रे उपलब्ध नसल्याने सध्या तात्पुरती सोय करून ठेवली आहे. शाळेची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
-संतोष हरपाल, मुख्याध्यापक, जि.प. शाळा नेणवली
शाळा दुरुस्तीसाठी पत्रे उपलब्ध नसणे ही मोठी समस्या आहे. आम्ही शिक्षक आज स्वतःचे पैसे खर्च करून दुरुस्ती करीत आहोत.
-राजेंद्र अंबिके, उपशिक्षक
कोरोनामुळे शाळा लवकर सुरू होणार नाहीत. त्यामुळे शाळा दुरुस्तीसाठी काही वेळ शासनाकडे आहे, मात्र या दुरुस्तीकरिता लागणार्या साहित्याची उपलब्धता वेळीच करून देणे आवश्यक आहे.
-डॉ. उमेश दोशी, पालक, माणगाव
शाळांना पत्रे उपलब्ध होत नसल्याने खूप गैरसोय होत आहे. इतर दुरुस्ती सुरू आहे. शासनाने व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन किमान लवकर पत्रे उपलब्ध करून द्यावेत.
-अनिल राणे, अध्यक्ष, पदवीधर शिक्षक संघटना, सुधागड