Breaking News

पांडवकडा धबधबा होणार पर्यटनस्थळ

पनवेल : रामप्रहर वृत्त

खारघर येथील प्रसिद्ध पांडवकडा धबधब्याचा विकास करण्यासाठी सिडकोच्या नियोजन विभागाने आराखडा तयार करून तो इंजिनीअरिंग विभागाला पाठविला आहे. त्यामुळे पुढील वर्षी पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येणार आहे.

पावसाळा सुरू झाल्यावर पांडवकडा निसर्गप्रेमींना साद घालतो. डोंगरातून कोसळणार्‍या या धबधब्याखाली चिंब भिजण्यासाठी पनवेल, नवी मुंबईसह मुंबई, ठाणे आणि आसपासचे पर्यटक मोठ्या संख्येने येथे गर्दी करतात, मात्र गेल्या 10 वर्षांत या धबधब्यावर काही अतिउत्साही पर्यटकांचा मृत्यू झाल्याने वन विभाग आणि पोलिसांनी येथे बंदी घातली आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीही आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी वृक्ष लागवडीच्या निमित्ताने पांडवकडा धबधब्याला भेट दिल्यानंतर पनवेल वन विभागाचे तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी अनिल परब यांनी पांडवकडा धबधब्यावर बांबूच्या छोट्या छोट्या नैसर्गिक व ग्रामीण पद्धतीच्या झोपड्या, विद्युत व्यवस्था, रस्ते, नाला ओलांडता यावा यासाठी पूल उभारल्यास पर्यटकांच्या पसंतीचा पांडवकडा धबधबा चांगले पर्यटनस्थळ होऊ शकतो, असा अहवाल सरकारकडे पाठविला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केल्यावर या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. यानंतर 65 लाख रुपये खर्चून येथे  बंधारा आणि चेंजिंग रूम उभारण्यात आले.

आमदार प्रशांत ठाकूर सिडकोच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर त्यांनी पांडवकडा धबधब्याकडे लक्ष केंद्रित केले. यानंतर सिडकोच्या नियोजन विभागाने सेंट्रल पार्क ते पांडवकडा धबधब्यावर ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांना सहजपणे जाता यावे यासाठी नऊ मीटर रुंदीचा रस्ता, पायर्‍या, रेलिंग, तसेच पर्यटकांना वाहत्या पाण्याचा आनंद घेता यावा अशा प्रकारच्या नावीन्यपूर्ण बांधकामाचा आराखडा तयार करून अभियांत्रिकी विभागाकडे पाठविला आहे. अभियांत्रिकी विभागाकडून बांधकामासाठी लागणार्‍या खर्चाची तरतूद करून निविदा काढण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना मौज करता येणार आहे.

सुरक्षिततेसाठी भिंत

उंच कड्यावरून वेगाने कोसळणार्‍या पाण्यात छोटासा दगडही लागून पर्यटक जखमी होऊ शकतात, तसेच काही अतिउत्साही पर्यटक हुल्लडबाजी करतात. त्यामुळे काही विपरीत घडू नये म्हणून काही अंतरावर दोन ते अडीच फूट उंचीची भिंत उभारताना धबधब्याचा नैसर्गिकपणा आबाधित राहील अशा प्रकारचे काम सिडकोतर्फे करण्यात येणार आहे.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply