मैदानात उतरविणारे कम्प्युटरबाबा गायब?

भोपाळ ः वृत्तसंस्था
मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या समर्थनात शेकडो साधूंची फौज घेऊन मैदानात उतरलेले
कम्प्युटरबाबा भोपाळमधून अचानक गायब झाले आहेत. कम्प्युटरबाबांचे हजारो साधूंसोबत सुरू असलेले समागम स्थळ रिकामे झाल्याचे चित्र आहे. भोपाळमध्ये दिग्विजय सिंह यांच्यासमोर भाजपच्या प्रज्ञासिंह ठाकूर यांचे आव्हान आहे. त्यामुळे ही लढत चांगलीच रंगतदार ठरत आहे.
दिग्विजय सिंह यांच्यासाठी पुढे सरसावलेले कम्प्युटरबाबा यांच्याविरुद्ध भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांनी कम्प्युटरबाबांची भाजपविरुद्ध सुरू असलेल्या हटयोग आणि धुनीची चौकशी सुरू केली आहे. याच चौकशीमुळे कम्प्युटरबाबा गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कम्प्युटरबाबांच्या समागम सोहळ्याचा गुरुवारी (दि. 9) अखेरचा दिवस होता, तर शुक्रवारी भोपाळ मतदारसंघातील प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे कम्प्युटरबाबा कमी सक्रिय दिसत आहेत, मात्र निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आदेशासंदर्भात कम्प्युटरबाबांकडून काहीही माहिती देण्यात आली नाही. कम्प्युटरबाबा शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होते. तत्कालीन सरकारने त्यांना मंत्रिपद बहाल केले होते, मात्र काही दिवसांनी कम्प्युटरबाबा शिवराज सरकारवर नाराज झाले होते, तसेच त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवराजसिंह चौहान यांच्याविरुद्ध भूमिका घेत काँग्रेसला पाठिंबा दिला होता.
RamPrahar – The Panvel Daily Paper