Breaking News

देशात कोरोनाचा नवा उच्चांक

साडेतेरा हजारांहून अधिक रुग्ण आढळले; 336 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या तीन लाख 80 हजारांच्या पार पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत तीन लाख 80 हजार 532 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 12,573 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन लाख चार हजार 710 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांमध्ये कोरोनाची लागण झालेले सर्वाधिक 13,586 नवे रुग्ण आढळून आले असून, 336 लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे सध्या एक लाख 49 हजार रुग्ण आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत जगभरात भारत चौथ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच भारत असा चौथा देश आहे, जिथे सध्या सर्वाधिक कोरोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात 53 हजारांहून अधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर राजधानी दिल्लीचा क्रमांक लागतो. तिसर्‍या क्रमांकावर तमिळनाडू, चौथ्या क्रमांकावर गुजरात आणि पाचव्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. या पाच राज्यांमध्ये देशातील सर्वाधिक रुग्ण आहेत.
जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूंचे प्रमाण अतिशय कमी असून, मृत्यूदरात भारत जगामध्ये आठव्या स्थानी आहे. कोरोनाच्या एकूण बळींपैकी 70 टक्के रुग्णांना अन्य काही ना काही आजार होते, असे आढळून आले आहे. त्यामुळे अन्य काही आजार असणार्‍यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकवार स्पष्ट केले आहे.
देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.96 टक्के आहे. एकूण दोन लाख चार हजार 711 रुग्ण बरे झाले असून, एक लाख 63 हजार 248 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या 24 तासांमध्ये एक लाख 65 हजार 412 नमुना चाचण्या घेण्यात आल्या व 7.78 टक्के रुग्णांची कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
महाराष्ट्रात सर्वांत जास्त रुग्णसंख्या
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे प्रमाण एक लाख 20 हजार 504पर्यंत वाढले आहे. राज्यात एका दिवसात तीन हजार 752 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यात आज 1672 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, तर आतापर्यंत एकूण 60 हजार 838 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 53 हजार 901 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
भारत पोहोचला ‘टॉप-4मध्ये’
भारताने शुक्रवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत ब्रिटनलाही मागे टाकले आणि जगभरातील टॉप-4 कोरोनाबाधित देशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. अमेरिका, ब्राझील, रशियानंतर कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारत चौथ्या स्थानावर आहे. भारतापेक्षा अधिक रुग्णसंख्या अमेरिका (2,263,651), ब्राजील (983,359), रशिया (561,091)मध्ये आहे. अमेरिका, ब्राझीलनंतर एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्या असणार्‍या देशामध्ये भारताचा क्रमांक लागतो.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply