आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश
उरण : वार्ताहर
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 22 मार्चपासून राज्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून करंजा-रेवस ही प्रवासी जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. ही सेवा पूर्ववत करण्याबाबत उरणचे आमदार महेश बालदी यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबईचे मुख्य बंदर अधिकारी कॅ. संजय शर्मा व रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे प्रयत्न केले. त्यास यश येऊन येत्या दोन ते तीन दिवसांत करंजा-रेवस तरसेवा पुन्हा सुरू होणार आहे.
अलिबाग येथे जाण्यासाठी करंजा येथून रेवस या जलमार्गाने नागरिक प्रवास करीत असतात, परंतु कोरोना व लॉकडाऊनमुळे हा जलप्रवास बंद करण्यात आल्याने तरसेवाही बंद झाली. परिणामी नागरिकांना रस्ते प्रवास करावा लागत होता. त्यात वेळ जास्त लागायचा व पैसेही जास्त मोजावे लागत असत.
उरणचे आमदार महेश बालदी यांनी करंजा ते रेवस तरसेवा सुरू करण्यात यावी या संदर्भात प्रयत्न केले व त्याला यश आले. दोन ते तीन दिवसांत करंजा ते रेवस ही तरसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे उरण ते अलिबाग व अलिबाग ते उरण अशी ये-जा करणार्या नागरिकांची चांगल्या प्रकारे सोय होणार आहे. याबद्दल नागरिकांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले आहेत.