Breaking News

नवी मुंबईची ‘फ्लेमिंगो सिटी’च्या दिशेने वाटचाल

नवी मुंबई : बातमीदार

स्वच्छ सर्वेक्षण 2022ची तयारी नवी मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. त्या अनुषंगाने शहरात येणार्‍या गुलाबी, लाल नारंगी रंगांच्या जगप्रसिद्ध फ्लेमिंगो पक्ष्यांच्या प्रतीकृतींनी शहर सजणार आहे. तर नवी मुंबईत येतानाच प्रवेश मार्गावर वेलकम टू फ्लेमिंगो सिटी असे फलक प्रवाशांचे स्वागत करणार आहेत. त्यामुळे यापूढे नवी मुंबई हे ’फ्लेमिंगो सिटी’ म्हणून नावाजले जाणार आहे.

नवी मुंबई पालिकेला उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्याव्यतिरिक्त मुंबईला लागून असल्याने आधुनिक शहराचा दर्जा या शहराला लाभला आहे. या शहराला विस्तीर्ण खाडी किनारा लाभला असून या खाडीत जगप्रसिद्ध अशा फ्लेमिंगो पक्ष्यांचा वावर असतो. ठाणे-ऐरोली येथील खाडीत वनविभागाने फ्लेमिंगो सफारी सुरू केली आहे. टीएस चाणक्य, एनआरआय व ऐरोली येथे येणारे फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी अगदी मुंबई, ठाणे, पनवेल व इतर परिसरांतून पक्षी निरीक्षक व अभ्यासक येत असतात. त्यामुळे पक्षी अभ्यासकांचे आवडते ठिकाण म्हणून नवी मुंबई प्रसिद्ध आहे.

भिंतीचित्रांमधून ’फ्लेमिंगो सिटी’ म्हणून नवी मुंबईची असलेली ओळख अधोरेखित व्हावी याचे प्रभावी सादरीकरण करण्यात येणार आहे. नवी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर वेलकम टु फ्लेमिंगो असे फलक लावले जाणार आहेत. भिंतीचित्रांप्रमाणे मुख्य चौक, कॉर्नर, दुभाजक अशा दर्शनी ठिकाणी आकर्षक शिल्पाकृती उभारल्या जाणार आहेत. सायन-पनवेल हायवेवर असणार्‍या विद्युत खांबांवर फ्लेमिंगो पक्ष्यांच्या आकाराची चित्रे बसवण्यात येणार आहेत. यासह नाल्यांवरील जाळ्यांवर फ्लेमिंगो पक्ष्यांची गुलाबी रंगातील चित्रे बसवण्यास सुरुवात झाली आहे. ’थ्री आर’ संकल्पनेनुसार टाकाऊपासून टिकाऊ फ्लेमिंगोंच्या शिल्पाकृतींचा अंतर्भाव असणार आहे.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नवी मुंबईत 17 वर्षांखालील आशियाई महिला फुटबॉल चषक होणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील विविध देशातील महिला फुटबॉलपटू नवी मुंबईत येणार आहेत. या स्पर्धेचे यजमानपद भूषविताना जानेवारीत होणारी अशियाई फुटबॉल स्पर्धा व त्यानंतर सहा महिन्यांनी होणारी फिफा फुटबॉल स्पर्धा होणार आहे. त्यामुळे जागतिक पटलावरदेखील नवी मुंबईची ओळख फ्लेमिंगो सिटी म्हणून होण्यास मदत होणार आहे.

शहरात दोन ते अडीच लाख देशी वृक्षांचे मियावाकी प्रकल्प आकारास येत आहेत. त्यामुळे जैवविविधता वाढीस लागणार आहे. कोपरखैरणेत तयार झालेल्या मियावाकी प्रकल्पात जैवविधता वाढल्याचे आढळून येऊ लागले आहे. त्यामुळे यापूढे फ्लेमिंगो पक्ष्यांसोबत मियावाकी प्रकल्प शहराला प्रसिद्धी मिळवून देण्यास हातभार लावेल.

आयुक्तांच्या निर्देशानुसार फ्लेमिंगो सिटीसाठी सुशोभीकरण करण्यात येत आहे. शहर सुशोभीकरणात नवी मुंबईचे वैभव असलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबईत येणार्‍यांना येत्या काळात आकर्षक गुलाबी रंगात फ्लेमिंगो सिटीचे दर्शन होईल.

-संजय देसाई, मुख्य शहर अभियंता, नवी मुंबई महानगरपालिका

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply