![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/06/Karnala-Abhayaranya1-1024x768.jpg)
पनवेल : वार्ताहर
राज्य सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथील केल्याने मागील तीन महिन्यांपासून ठप्प पडलेले व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. असे असले तरी कोरोनाचा धोका कायम आहे. पनवेल परिसरात दरदिवशी कोरोनाच्या रूग्णांत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल प्रशासनाने शहरातील गर्दीचे ठिकाणे बंद केली आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने परिसरातील पर्यटनस्थळे सुध्दा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
पनवेलला परिसरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे रायगडसह ठाणे आणि मुंबई उपनगरातील पर्यटक मोठ्याप्रमाणात येथे पर्यटनासाठी येतात. सध्या कोरोनाचे संकट आहे. पर्यटकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील कर्नाळा अभयारण्य, पांडवकडा धबधबा, माची प्रबळ (कलावंतीण दुर्ग) आदींसह लहान मोठे पर्यटनस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. पनवेलमधील कनार्ळा अभयारण्य हे निसर्गप्रेमींसाठी नेहमीच पर्वणीचे ठरले आहे. येथील निसर्ग सौंदर्य, पशु पक्षी, जीवसृष्ठी हे पर्यटकांना आकर्षित करीत असते. वर्षभरात लाखो पर्यटक याठिकाणी येतात. विशेषत: पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी रिघ लागलेली असते. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा असतो. परंतु लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून कर्नाळा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
पावसाळ्यातसुध्दा हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवले जाणार असल्याची माहिती कर्नाळा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांनी दिली. त्याचप्रमाणे खारघरमधील पांडवकडा धबधबा देखील पावसाळ्यात पर्यटकांना भूरळ घालतो. पावसाळ्यात या ठिकाणी तरूणाईचे जथ्थे येतात. येथील धबधब्यात बुडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे मागील काही वर्षापासून पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. यावर्षी देखील पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही, असे वनविभागाचे अधिकारी डि. एस. सोनावणे यांनी दिली.