पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक भाजी आणि फळविक्रेते रस्त्यावर किंवा फुटपाथवर बसून आपल्या मालाची विक्री करीत आहेत. यापैकी अनेकांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसत असतानाही ते दवाखान्यात जाऊन उपचार घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे घातक असल्याने अशा विक्रेत्यांची नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे असल्याची मागणी प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन उठवल्यावर अनेक भाजी व फळविक्रेते रस्त्यावर किंवा फुटपाथवर बसून विक्री करीत आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत आहेत. नवीन पनवेल ए टाइपमध्ये फळविक्रेत्याला कोरोना झाल्यामुळे अनेकांना त्याचा संसर्ग झाल्याचे दिसून आले असतानाही अनेक विक्रेते कोणतीही काळजी न घेता धंदा करीत आहेत. सेक्टर 15मधील फळविक्रेता ताप, खोकला असतानाही धंदा करीत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोरोनाच वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिकेने रस्त्यांवरील विक्रेत्यांची ठरावीक कालावधीनंतर आरोग्य तपासणी करूनच त्यांना धंदा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांनी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.