नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ड्रग्स बाळगणे हा त्यापेक्षा गंभीर गुन्हा आहे, त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबवरही बंदीची कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी बीसीसीआयच्या एका अधिकार्याने केली आहे. पंजाबचे सहमालक नेस वाडिया याला जपानमध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे वाडिया आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वाडिया ग्रुप हा देशातील सर्वात जुन्या बिझनेस ग्रुपपैकी एक आहे. या ग्रुपच्या संचालक कुटुंबातील नेस वाडिया हा महत्त्वाचा सदस्य आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मार्च महिन्यामध्ये न्यू चिटोज विमानतळावर नेस वाडियाकडे 25 ग्राम गांजा सापडला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. ‘स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ड्रग्स बाळगणे हा त्यापेक्षा मोठा गंभीर गुन्हा आहे आणि त्यामुळे वाडियासह संघावरही कठोर कारवाई करण्यात
यावी. एका संघाला एक न्याय अन् दुसर्याला दुसरा… असे का? वाडियावर क्रिकेट संदर्भात आजीवन बंदी घालावी,’ अशी मागणी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्याने केली आहे.
वाडियाच्या या कृत्यामुळे पंजाब संघाचे भविष्यही धोक्यात आणले आहे. आयपीएलच्या नियमानुसार सहभागी संघातील कोणताही अधिकारी अशा प्रकारच्या गुन्ह्यात सहभागी नसावा. जपानमध्ये पुढच्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांसाठी अमली पदार्थविरोधी मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे. यामुळे वाडियाला अटक करून त्याला तत्काळ शिक्षा सुनावण्यात आली. या बातमीमुळे वाडिया समूहातील कंपन्यांचे समभाग काही प्रमाणात कोसळले आहेत.