200 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कर्जत : बातमीदार
निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या झुगरेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक रवी काजळे यांनी पुढाकार घेऊन रोटरी क्लबच्या माध्यमातून आदिवासी आणि गरजू ग्रामस्थांना महिनाभर पुरेल एवढे धान्य मदत म्हणून उपलब्ध करून दिले. रोटरी सदस्य आणि पोलीस उपअधीक्षक यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली.
कोरोना महामारीचे संकट आणि हाताला काम नाही या चिंतेत असणार्या गरिबांना निसर्ग वादळाने 3 जून रोजी तडाखा दिला होता. यामध्ये वाड्या-वस्त्यांवरील घरांचे प्रचंड नुकसान झाले. कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील झुगरेवाडी आणि परिसरातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे हतबल झालेले नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत होते. त्याची ही हतबलता रवी काजळे यांनी आदिवासी भागात नेहमीच विविध सामजिक उपक्रम राबविणार्या रोटरी क्लबच्या निदर्शनास आणून दिली.
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे (वरळी) अध्यक्ष सबिना गुप्ता, मार्क मेलोनी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हरजतसिंग तलवार यांच्यासह झुगरेवाडी दत्तक घेऊन विशेष लक्ष देणार्या कविता गोडबोले, जयंत नायरी यांनी धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या हस्ते सुमारे 200 गरजू आदिवासी लाभार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंचे पालन करत किमान महिनाभर पुरेल एवढे किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
रोटरी सदस्यांना कोरोनामुळे उपस्थित राहता न आल्याने कविता गोडबोले यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधत लाभार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध करून दिली असल्याचे सांगितले. या वेळी कर्जत शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख गोविंद दरवडा तसेच गणपत केवारी, वसंत पारधी, जगदीश झुगरे, लक्ष्मण झुगरे, प्रदीप सैंदाणे, प्रल्हाद हुमणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.