खोपोली : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे अध्ययन करुन तो इतिहास समजून घेऊन तरुण पिढीने आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शिवव्याख्याते प्रा. अविनाश मोरे यांनी कडाव येथे केले.
अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या कडाव (ता. कर्जत) येथील शिशू मंदिरमधील व्याख्यानमालेत प्रा. मोरे बोलत होते. शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत कुडे, सदस्य चोळकर, मुख्याध्यापिका गुरव मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. प्रारंभी दिपप्रज्वलन झाल्यानंतर माजी मुख्याध्यापिका डोंगरे मॅडम यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. अविनाश मोरे यांनी व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना अनेक प्रसंग उभे केले. स्वराज्य स्थापनाच्या संकल्पनेतून दिसणारी महत्वाकांक्षा, स्वप्नपूर्तीसाठी केलेले नियोजन कसे होते, याचे सविस्तर वर्णन त्यांनी व्याख्यानातून सादर केले. उंबरखिंडीत मोजक्या मावळयांना घेऊन कार्तालब खानाचा पराभव व पूणे पेडगाव येथे बहादूर खानाला गनिमी काव्याने दिलेला शह हे दोन प्रसंग त्यांनी व्याख्यानातून उभे केले. ते पुढे म्हणाले की, सध्याचा तरुण मोबाईल फोन संस्कृतीत हरवून गेला आहे आपले ध्येय्य, उद्दीष्ठ्ये विसरून गेला, वाचन कमी झाले, त्यामुळे अभ्यासू वृत्ती हरवून गेली आहे. भारत महासत्तेच्या मार्गावर असताना तरुणांनी मागे राहू नये, असे आवाहन मोरे यांनी या वेळी केले.