शेअर बाजार जेव्हा वर जातो, तेव्हा सर्वसामान्य आणि नव्या गुंतवणूकदारांचे लक्ष त्याकडे जाते. अशा गुंतवणूकदारांसाठी एक सावधानतेचा इशारा सध्या बाजार देतो आहे. तो काय आहे?
शेअरच्या किंमती या त्यांच्या कंपन्यांच्या मिळकतीच्या आधीन असतात असं बाजारात म्हटलं जातं, परंतु तेवढ्याच त्या भावनेच्या देखील आहारी असतात. यातील पाहिलं वाक्य खरं मानलं तर सध्या काही मोजकी एकदोन क्षेत्रं वगळता, सर्वच क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांचे मागील तिमाहीचे निकाल अत्यंत निराशाजनक आलेले आहेत व तरीही आपलं शेअरमार्केट गेल्या साडेतीन महिन्यांच्या उच्चांकावर आहे आणि म्हणूनच पहिलं विधान आपल्याला संभ्रमात टाकतं आणि दुसरं विधान खरं ठरताना दिसतंय. शेअर बाजारात गुंतवणुकीचे दोन पर्याय असतात, एक अल्प मुदतीसाठी म्हणजे एक दिवस ते काही महिने, ज्यामध्ये आपल्या लावलेल्या मुद्दलावर ठराविक टक्के परतावा मिळाला की त्यातून बाहेर पडायचं, यालाच काही लोक ट्रेडिंग देखील म्हणतात. तर, दुसरा पर्याय म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक, ज्यामध्ये ठराविक परतावा मिळाला तरी दीर्घकालावधीसाठी ती गुंतवणूक सांभाळून ठेवणं, जसं आपण बँकेतील मुदतठेवीसोबत करतो. मात्र अनेकदा बरेच गुंतवणूकदार याच्या अगदी उलट करताना दिसतात, म्हणजे ट्रेडिंगसाठी घेतलेल्या शेअर्सचे भाव खाली आले तर लॉस होईल म्हणून दीर्घ कालावधीसाठी सांभाळत बसतात व त्यांचा भाव कधीही येत नाही आणि दीर्घकालावधीसाठी म्हणजेच संपत्तीनिर्मितीसाठी घेतलेले शेअर्स थोडासा नफा मिळत असल्यास लगेच विकून टाकतात.
अनेकदा म्हटलं जातं की, शेअर बाजारातील गुंतवणूक ही दीर्घकालीन असावी परंतु याचा खरा अर्थ फारच कमी जणांना उमजतो. म्हणजे, उत्तम कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक ही प्रदीर्घ काळात उत्तम नफा मिळवून देते म्हणजे जर घेतलेले शेअर्स प्रदीर्घ कालावधीपर्यंत सांभाळले तर! परंतु असे शेअर्स घेताना त्या कंपन्यांचा सर्वतोपरी विचार करून त्यांची खरेदी योग्य भावात केलेली असली पाहिजे. कारण, उत्तम भावात एखाद्या ठीकठाक कंपनीचे शेअर्स घेण्यापेक्षा ठीकठाक भावात एखाद्या उत्तम कंपनीचे शेअर्स विकत घेणे केव्हाही चांगले. कंपनीची निवड अचूक असल्यास त्या कंपनीचे शेअर्स दीर्घ कालावधीत उत्तम नफा पदरात पडून देऊ शकते. परंतु सध्याची वेळ ही दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी अगदी योग्य वेळ नाही. त्यासाठी थोडं थांबावं लागलं तरी चालेल. ज्याप्रमाणं गलबत वल्ही न मारताही नुसत्या वार्यावर काही अंतर जाऊ शकते, त्याचप्रमाणं आपला बाजार देखील सध्याच्या परिस्थितीत दिशाहीन वाटतो आणि एखाद्या सुकाणू तुटलेल्या किंवा वल्ही नसलेल्या गलबताप्रमाणं तेजीच्या वार्यावर स्वार होऊन अजून वर देखील जाऊ शकतो. ज्याप्रमाणं एखादा सूज्ञ मनुष्य अशा भरकटत चाललेल्या गलबतात बसायचं धाडस करू शकत नाही, त्याचप्रमाणं एखादा गुंतवणूकदार देखील. अन्यथा या तेजीवर स्वार होऊन भलेही हे गलबत काही अंतर दूर जाईल देखील आणि एखाद्या बेटाला धडकून तिथं अडकून पडेल कारण त्याला वल्ही नसल्यानं तिथून पुढं अथवा मागं जाता येणार नाही. तशीच परिस्थिती सध्या बाजाराची आहे.
- बाजार महाग झाला म्हणजे काय?
बाजार पडण्याआधी म्हणजे फेब्रुवारीमध्ये निफ्टी50 चा प्राईस टू अर्निंग्स रेशयो होता 25 व आता देखील आहे 25.25 याचा अर्थ म्हणजे निफ्टी 50 मधील सर्व कंपन्यांचा एकत्रित विचार केल्यास, 1 रुपया कमावण्यासाठी आपण 25 रुपये मोजतोय. सर्वसाधारणपणे 25च्या वर निर्देशांक (बाजार) महाग गृहीत धरला जातो. जरी या आकड्यांकडं दुर्लक्ष केलं तरी प्रत्येक रेटिंग एजन्सी हेच ओरडताना आढळतेय की बाजारात पुन्हा एकदा मंदी येणार. कारणही तसेच आहे, या लॉकडाऊनमुळं भारतीय अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेत आहे, त्यातच वाढलेल्या इंधनाच्या किंमती, बेरोजगारीचं वाढतं प्रमाण, बँक प्रणालीवर आलेला भार, नवीन एनपीए होतील का या भितीनं कर्ज वाटपावर आलेली मर्यादा, चीनची चिंता या सर्व गोष्टी जर अर्थव्यवस्थेपुढं बागुलबुवा उभा करत असतील तर एक चाणाक्ष गुंतवणूकदार म्हणून आपल्याला जागरूक राहणं गरजेचंच आहे. अर्थात, आजच्या अशा दोलायमान अवस्थेत आणि अस्थिर बाजारात देखील अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या आपण पुढे पाहूच.
- आयटी आणि सोलर क्षेत्रात तेजी
मागील आठवड्यात भारतीय निर्देशांक 1 टक्क्यांच्या वाढीनं बंद झाले. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांकानं 138 अंशांची वाढ नोंदवली तर बाँबे स्टॉक एक्स्चेंजचा सेन्सेक्स निर्देशांक सुमारे 440 अंशांनी वधारून बंद झाला. निफ्टी50 मधील इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स हा शेअर सुमारे 12 टक्के, तर निफ्टी 500 कंपन्यांमधील करून वैश्य बँकेचा शेअर 35 टक्के वाढला. तर निफ्टी 50 मधील आयसीआयसीआय बँकेचा शेअर साडेचार टक्के कोसळला. मागील आठवड्यात वायदेबाजाराची सौदापूर्ती असल्यानं शेवटचे दोन दिवस निफ्टी एका ठरावीक पट्ट्यामध्येच व्यवहार होताना आढळली. चीनच्या सोलर पॅनल आयातीवर कस्टम ड्युटी वाढवण्याबद्दल विचार चालू असल्यानं अशा गोष्टी भारतात बनवणार्या कंपन्यांचे म्हणजे एबीबी, भेल मागील आठवड्यात वधारले. अमेरिकेनं एच 1 बी व्हिसा या वर्षाखेरीपर्यंत रद्द करण्याचं सूतोवाच केल्यानंतर ऑफशोअर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं काम करणार्या इन्फोसिस व टीसीएस या कंपन्यांचे शेअर्स अनुक्रमे साडेसहा व पाच टक्क्यांपर्यंत वधारले. बाजाराची चाल येणार्या आठवड्यात देखील तेजीचीच राहील असं दिसतंय. बँकेच्या शेअर्सची मागणी ओसरून त्यांच्यात नफेखोरी सुरु झाल्यास बाजारासाठी ते तापदायक असेल. निफ्टीसाठी 10600 ही लागलीच प्रतिकार पातळी असून 10100 व 9900 ह्या आधार पातळ्या संभवतात. पर्यायी गुंतवणूक म्हणून सोन्यामधील गुंतवणूक एक चांगला पर्याय ठरू शकते. ही गुंतवणूक देखील घरबसल्या मोबाइलवरून करता येऊ शकते, जी संपूर्ण कायदेशीर व व्यवहारिक जोखीमरहीत असते.
- सुपरशेअर – रुची सोया
आजच्या सुपरशेअरला रॉकेटशेअर असं म्हटलं तरी चालणार आहे, कारण देखील तसंच आहे. ही कंपनी शेअरबाजारातून 13 नोव्हेंबर 2019 रोजी डी-लिस्ट झाली होती तेव्हा तिच्या शेअर्सचा भाव रु. 3.30 होता. 27 जानेवारी 2020 रोजी या कंपनीची शेअरबाजारात पुन्हा नोंदणी (री-लिस्टिंग) झाली तेव्हा या कंपनीच्या शेअर्सचा भाव होता रु. 16.20, म्हणजे दोन-अडीचच महिन्यांत सुमारे पाचपट. परंतु खरी गोष्ट पुढे आहे. ह्याच कंपनीचा मागील आठवड्यातील भाव आहे, रु. 1519. अविश्वसनीय अशी तब्बल 94 पट वाढ, ती देखील केवळ पाच महिन्यात. देशातील कंपन्यांच्या दिवाळखोरीबाबत निर्णय घेणार्या कोर्टानं (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) कंपनीच्या रु. 4350 कोटी रुपयांची बोली मंजूर केल्यावर रुची सोया मधील 98.87 टक्के हिस्सेदारी असलेल्या पतंजलीने गेल्या वर्षी कंपनीची सूत्रे हाती घेतली.
कर्ज पुनर्रचना व बाजारात अत्यंत कमी शेअर उपलब्धी (फ्री फ्लोट) अशा प्रकारे कात टाकलेल्या या कंपनीवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या नसत्या तरच नवल. ह्याच कारणांमुळं ह्या कंपनीच्या शेअर्सनी इतकी मोठी तेजी दर्शवली आहे. कंपनीच्या एकूण 29.58 कोटी शेअर्सपैकी 98.87 टक्के शेअर्स पतंजली समूहाकडं आहेत तर उर्वरित 33.4 लाख शेअर्स इतर लोकांच्या मालकीचे आहेत. कंपनीची न्यूट्रेला तेल, महाकोश तेल, सोया चंक्स, विविध साबणं इ. उत्पादनं लोकप्रिय आहेत. अजून ह्या कंपनीचे शेअर्सचे भाव किती वर जातील हे नक्की सांगता येणार नाही, मात्र नफेखोरीमुळं भाव खाली येताना देखील अशाच झपाट्यानं येऊ शकतात. त्यामुळं या भावात नवीन गुंतवणूक शक्यतो टाळावी. आता त वरून ताकभात ओळखून एक जोखीम म्हणून अशाच इतर कांही कंपन्यांकडं पाहिल्यास अनेक संधी आजूबाजूस उपलब्ध होऊ शकतात.
(शेअर बाजार हा गुंतवणुकीचा जोखीम असलेला मार्ग आहे. त्यामुळे त्याची पुरेशी माहिती न घेता त्यात पैसे गुंतविणे जोखमीचे ठरू शकते. त्यात नव्याने गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांनी याची जाणीव ठेवूनच हा मार्ग निवडावा.)
-प्रसाद ल. भावे
sharpadvisers@gmail.com