महिला संघाचा सलग पाचव्यांदा पराक्रम
काठमांडू : वृत्तसंस्था
‘सॅफ’ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिलांनी सलग पाचव्यांदा विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम सामन्यात भारताने नेपाळला 3-1 असे पराभूत केले.
‘सॅफ’ स्पर्धेमध्ये सलग 23 सामने अपराजित राहण्याचा विक्रमही भारतीय संघाने केला आहे. भारताकडून दालिमा छिब्बर, ग्रेस डांगमेइ आणि अंजू तमांग यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
सामन्याच्या प्रारंभापासूनच दोन्ही संघांनी एकमेकांवर धारदार आक्रमणे केली, मात्र दोन्ही संघांच्या गोलरक्षकांनी गोल रोखल्याने प्रारंभी कुणालाच यश मिळाले नाही. सामन्याच्या 26व्या मिनिटाला दालिमाने मिळालेल्या फ्री किकचा लाभ उठवत 30 यार्डवरून गोल लगावत भारताचे खाते खोलले. त्यामुळे भारताला पूर्वार्धातच 1-0 अशी आघाडी लाभली. त्यानंतर अवघ्या सहाच मिनिटांनी भारताच्या रत्नबालादेवीचा गोलमध्ये जाणारा फटका नेपाळच्या गोलीने वाचवल्याने दुसरा गोल रोखला गेला. सामन्याच्या 34व्या मिनिटाला नेपाळच्या सबित्राने गोल करीत बरोबरी साधली. त्यामुळे मध्यंतराला दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते.
उत्तरार्धात भारतीय महिलांनी खूप आक्रमक खेळ करीत अधिक संधी निर्माण केल्या. त्यामुळे सामन्याच्या 63व्या मिनिटाला संधी साधत संजूने दिलेल्या पासवर ग्रेसने भारतासाठी दुसरा गोल लगावला. मग बदली खेळाडू म्हणून आलेल्या अंजूने सामन्याच्या 78व्या मिनिटाला इंदुमती काथिरेसानने दिलेल्या पासवर गोल लगावत भारताच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
अंतिम टप्प्यात नेपाळने अनेक आक्रमणे करीत गोल करण्याचे निष्फळ प्रयत्न केले, पण भारतीय बचावफळीने त्यांची सर्व आक्रमणे परतवून लावल्याने भारताने 3-1 अशा दणदणीत विजयासह जेतेपदावर नाव कोरले.