Breaking News

माणगावात 15 नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या 28

माणगाव ः प्रतिनिधी

रायगडात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हावासीय चिंताग्रस्त आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका असणार्‍या माणगावात दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर केला आहे. दोन महिन्यांत तालुक्यातील 28 गावांतून आजपर्यंत 94 जणांना कोरोनाची लागण होऊन त्यापैकी 64 जण बरे झाले असून दोघांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 28वर पोहचली आहे. माणगाव नगरपंचायत हद्दीत रविवारी आठ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून तालुक्यातील हेदमलई येथील दोन रुग्ण, तर माणगावजवळील इंदापूर गावात पाच नवे रुग्ण अशा एकूण 15 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुकावासीयांची चिंता वाढली आहे.

माणगाव नगरपंचायत हद्दीतील उपजिल्हा रुग्णालय माणगाव व तहसील कार्यालय या सरकारी कार्यालयातून कोरोनाचे रुग्ण काही दिवसांपूर्वी आढळले असून आता घरातून कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्णांत लहान बाळापासून वयस्कर मंडळींचा समावेश आहे. माणगावात 11 व 13 वयोगटातील मुला-मुलींना कोरोनाची  लागण झाल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. तालुक्यातील नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने वेळोवेळी केलेल्या सूचनांनुसार प्रशासनाच्या आवाहनाला साथ देऊन कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडता घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले आहे.

नागोठणे विभागात कोरोना रुग्ण

नागोठणे ः शहरासह विभागात कोरोनाने आपले जाळे घट्ट करण्यास सुरुवात केली असून विभागातील पळस ग्रामपंचायत हद्दीतील शेतपळस येथील एका 35 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही लागण एखाद्या कंपनीमार्फतच झाल्याचा संशय प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी व्यक्त केला. दोनच दिवसांपूर्वी नागोठणेतील दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरातील सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून मंगळवारपर्यंत त्यांचा रिपोर्ट अपेक्षित असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply