कळंबोली : प्रतिनिधी – तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून सोडण्यात येणार्या विघातक आणि दर्पयुक्त रसायनमिश्रित पाण्याने कासाडी नदीच्या पाण्याला लाल रंग आल्याने परिसरातील नागरिकांत घबराघटीचे वातावरण पसरले आहे. या विभागातील कारखान्याच्या विघातक प्रदुषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांचे जीवन उध्वस्त झाले आहे. संबंधित कारखान्यांवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
तळोजा एमआयडीसीतील कारखान्यांतून सोडण्यात येणार्या विघातक विषारी रसायनमिश्रित पाण्याने कासाडी नदीत प्रदुषित झाली आहे. या विघातक विषारी पाण्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कासाडी नदीच्या प्रदुषणाबाबत राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी)मध्ये दाद मागितली असता या न्यायालयाने कासाडी नदीच्या प्रदुषणाबाबत संबंधित यंत्रणांना जबाबदार धरून दंडही ठोठावला आहे. या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकार्यांना वेतन रोखण्याची तंबीही दिली होती. तरीही संबंधित यंत्रणा, प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक विकास मंडळ अधिकारी धडा घेत नसून प्रदूषण करणार्या कराखान्यांना मदत करीत असल्याने रविवारी (दि. 28) विघातक रसायनमिश्रित पाणी सोडल्याने कासाडी नदी लाल पाण्याने वाहत आहे. कानपोली गावच्या पुलाजवळील कासाडी नदीत रसायनमिश्रीत पाणी सोडल्याने गावातील लोक घाबरून गेले आहेत.
कासाडी नदी दुषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, पशुपक्षींवरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी फक्त नोटीसा पाठवित असल्याने कारखाने बिनधास्त रसायनमिश्रित पाणी सोडून कासाडी नदी दूषित करत आहेत. देशासह राज्यात कोरोनाचा सुरू असताना त्याचा फायदा घेत येथील कंपन्या मोठ्या प्रमाणात जल व वायू प्रदूषण करीत आहेत त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. रसायनमिश्रित वायू कारखान्यांतून सोडला जात असल्याने नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत. कासाडी नदीच्या प्रदुषणाला सर्वस्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व तळोजा औद्योगिक विकास महामंडळ जबाबगार असल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली आहे. याबाबत नवी मुंबई महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किशोर किल्लेकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी ज्या कारखान्याने पाणी सोडले आहे त्या कंपनीवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले.