कळंबोली ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद झाले. त्यामुळे रोजंदारी, नाका कामगारांची रोजीरोटी बंद झाली. निराधार महिलांची कामे गेली. व्यवसाय ठप्प झाले तसेच अनेकांच्या नोकर्या गेल्या. हातावर पोट असलेल्यांना पोट कसे भरायचे याची चिंता लागली. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. या परिस्थितीत गरीब-गरजू उपाशी राहू नयेत म्हणून आधार फाऊंडेशनने माणुसकी जपत त्यांच्यावर अन्नछत्र धरले. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
व्यापारी संघटना आधार फाऊंडेशनचे मधुकर शिंदे, हरिष पटेल व त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने तीन महिने दररोज 400 ते 450 नागरिकांना दोन वेळचे शिजवलेले अन्न वाटप करण्यात येत आहे. नवी मुंबई परिसरातील झोपडपट्ट्या, पुलाखाली वास्तव्यास असणारे नागरिक रोजंदारी व कंत्राटी कामावर आहेत. कोरोनाच्या फैलावामुळे सर्वच कामे व उद्योगधंदे बंद पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी तीन महिन्यांपासून आधार फाऊंडेशनकडून 40 हजार नागरिकांना शिजवलेले अन्न वाटप करण्यात आले. ही सेवा अविरत सुरू आहे. लवकरच कळंबोली आणि पनवेलमध्येही अन्नाचे वाटप सुरू करण्यात येणार आहे, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.