अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाडमधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरात पुराचे पाणी घुसले. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
रायगड जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळपर्यंत संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 115.71 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 1670.06 मिमी पाऊस पडला असून, जिल्ह्याच्या वार्षिक पर्जन्यमानाच्या हा 51.92 टक्के पाऊस आहे.
धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 17 धरणे पूर्णपणे भरून वाहू लागली आहेत.
प्रादेशिक हवामान विभागाने 4 ते 6 ऑगस्ट या कालावधीत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नदीकिनार्यांवरील तसेच दरडी कोसळण्याच्या शक्यता असलेल्या गावांतील जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याबाबत प्रशासन काळजी घेतच आहे, पण पावसाळ्याच्या दिवसांत लेप्टोपायरेसिसचाही धोका जास्त आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात फिरू नये. लोकांनी काळजी घ्यावी.
-निधी चौधरी, जिल्हाधिकारी
महाडमध्ये शिरले पुराचे पाणी
महाड : प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे सावित्री, काळ आणि गांधारी या नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने महाड शहरात पाणी शिरून पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नागरिक आणि व्यापारी धास्तावले.
सावित्री नदीचे पुराचे पाणी महाडमधील भोईघाट येथून सुकटगल्लीत शिरले. यामुळे मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी दाखल झाले. परिणामी व्यापारी आणि नागरिकांची धावपळ उडाली. त्याचप्रमाणे दस्तुरी नाका येथेदेखील पाणी वर आल्याने दस्तुरी नाका ते नातेखिंड हा मार्ग पाण्याखाली असल्याने तो वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. महाड-विन्हेरे मार्गावरील दादली पुलाजवळून लगतच्या सावित्री नदीचे पाणी जाऊ लागल्याने प्रशासनाने या ठिकाणीही बंदोबस्त ठेवला. केंबुर्लीनजीक असलेल्या गांधारी पुलावरून पुराचे पाणी गेल्याने येथूनदेखील महाड शहरात येणारी वाहतूक ठप्प झाली होती.