Breaking News

कोरोना काळात इतर आजारांवरील रुग्णांना जीवदान देणारे डॉक्टर नव्हे तर देवदूत!

पनवेल : रामप्रहर वृत्त

सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे इतर रुग्णांचे हाल होत आहेत, पण काही डॉक्टर असे असतात की ते रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कार्यरत असतात. अशांपैकीच एक आहेत कॅन्सरवरील टाटा मेमोरीयल हॉस्पिटलमधील डॉ. शैलेश व्ही. श्रीखंडे. त्यांच्याबद्दल त्यांच्याकडूनच बरे झालेले सतीश भालचंद्र वैरागी यांनी सांगितलेले अनुभव बोलके आहेत. 

सतीश वैरागी म्हणतात, माझे वडील कै. भालचंद्र वैरागी यांचे 2016मध्ये ब्लड कॅन्सरने देहावसान झाले होते. त्यानंतर 2019मध्ये मला स्वत:ला धक्का बसला. माझी पत्नी, मुलगा, ताई व सर्व नातेवाइक माझ्या डोळ्यासमोर चलचित्राप्रमाणे येत होते. कुटुंबाचा विचार करून मी स्वत:ला सांभाळून घेतले.

टाटा मेमोरीयल हॉस्पिटलमध्ये माझी डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी प्रथम तपासणी केली. डॉ. श्रीखंडे यांचे शिक्षण एमएसएमडी एफआरसीएस (ऑनर) असून, हॉस्पिटलचे डेप्युटी डायरेक्टर, प्रोफेसर आणि मुख्य कॅन्सर सर्जन म्हणून ते काम पाहात आहेत. हॉस्पिटलमध्ये ते दिवस-रात्र काम करतात. त्यांचा चेहरा नेहमी हसरा व ताजातवाना असतो. त्यांचे चालताना पाऊल व हालचालही त्यांच्या कॅन्सर अभ्यासाचा दांडगा अनुभव सांगते.

डॉ. श्रीखंडे 8 वाजता ऑपरेशनसाठी हजर होतात. त्यानंतर ओपीडीमध्ये पेशंटला तपासण्यासाठी येतात. एवढ्या मोठ्या संख्येने पेशंटला शांतपणे विविध प्रश्न विचारून माहिती घेत असतात. कधी त्यांना चिडताना पाहिले नाही. पेशंटच्या प्रत्येक कॅन्सरचा प्रकार डॉ. श्रीखंडे यांना चँलेज देत असतो, परंतु शिक्षण व अनुभव यांच्या जोरावर ते पेशंटच्या आजारावर मात करून त्यांना बरे करतात. फक्त कॅन्सर पेशंट चौथ्या स्टेजला असल्यास त्याचा लाईफ स्पॅन वाढविला जातो. त्यामुळे डॉ. श्रीखंडे यांचा नावलौकिक भारतातच नव्हे तर परदेशातसुद्धा आहे. त्यांना सतत परदेशात सेमिनार, ऑपरेशनसाठी जावे लागते. अशा डॉ. श्रीखंडे यांनी माझे ऑपरेशन 21 मे 2019 रोजी केले. मला सकाळी 7 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. माझ्या पोटात कॅन्सरच्या एकूण 17 गाठी पसरल्या होत्या. काही वेळातच ऑपरेशनला सुरुवात झाली. 12 ते 13 तास ऑपरेशन चालू होते व ते यशस्वी झाले. त्यानंतर डॉ. श्रीखंडेंनी हे यश माझे एकट्याचे नसून माझ्या टीमचे आहे, असे सांगितले. यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून आला. डॉ. श्रीखंडे सरांसोबत डॉ. मनीष भंडारे, डॉ. विक्रम, डॉ. श्रवण नाडकर्णी व इतरांची टीम रुग्ण बरे करण्यासाठी झटत असते. या सर्वांना सलाम, अशा शब्दांत सतीश वैरागी यांनी या देवदूतांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply