पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका हद्दीत वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाच्या उपचारासाठी खाजगी कोविड हॉस्पिटल आवश्यक असल्याने शनिवारी (दि. 4) महापालिका आयुक्तांनी पाच खासगी रुग्णालयांना कोविड-19 रूग्णांलय म्हणून
मान्यता दिली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपलब्ध हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याची तक्रार आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांचेकडे केल्यानंतर काही तासातच महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मान्यतेने वैद्यकिय आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी दिले. या रुग्णालयात शासनाने निश्चित केलेल्या शुल्कामध्ये उपचार दिले जातील.
कोविडची मान्यता मिळालेल्या खासगी रुग्णालयांमध्ये खारघर सेक्टर 20 येथील पोलारिस हॉस्पिटल, रोडपाली सेक्टर 20 येथील सुअस्थ हॉस्पिटल, कळंबोली सेक्टर 3 ई येथील सत्यम हॉस्पिटल, कळंबोली सेक्टर 1 येथील सुश्रुत कोविड-19 मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, खारघर सेक्टर 4 येथील निरामय हॉस्पिटल यांचा समावेश आहे. या हॉस्पिटलमध्ये नागरिक कोविड करिता उपचार घेऊ शकतात, अशी माहिती उपायुक्त जनसंपर्कजमीर लेंगरेकर
यांनी दिली.