कर्जत ः बातमीदार
कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. या विषाणूवर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा शंभरी पार करून पुढे गेला आहे. त्या अनुषंगाने कर्जत येथील भाजपच्या किसान मोर्चा प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांच्याकडून कर्जतमध्ये मी कर्जतकर हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत कर्जतमधील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना छोट्या-मोठ्या आजारासाठी मोफत औषधेदेखील दिली जात आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात कर्जतकरांच्या दारी आरोग्य सुविधा मिळत असल्याने या उपक्रमाचे कर्जतकरांकडून स्वागत होत आहे.
कर्जत तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे. सर्वसामान्य नागरिक, पोलिसांसह सरकारी व खासगी डॉक्टरदेखील कोरोना संक्रमित झाले. तेव्हा कर्जतकरांच्या आरोग्याचा विचार करून कर्जत येथील भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांच्या वतीने अंत्योदय प्रतिष्ठान आणि संकल्प सामाजिक संस्था तसेच कर्जत भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जतमध्ये मी कर्जतकर अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत कर्जतमधील सर्व प्रभागातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे.
या अभियानांतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची थर्मल स्कॅनिंग, ताप, सर्दी, पडसे, खोकला, अंगदुखी, काही किरकोळ दुखापत अशा आरोग्यविषयक समस्यांची तपासणी करून त्यावर असणारे औषधही मोफत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह नागरिकांना रोगप्रतिकारशक्तीच्या गोळ्या, सॅनिटायझर, मास्क आदी सुरक्षेची साधनेही मोफत वाटप करण्यात येत आहेत. तपासणी करणारे डॉक्टर, त्यांचे सहकारी पीपीई किट वापरून तपासणी करीत आहेत. आतापर्यंत अडीच हजार लोकांची तपासणी करून त्यांना सुरक्षा साधने तसेच औषधे देण्यात आली आहेत. लॉकडाऊन काळात कोरोनाच्या भीतीपोटी डॉक्टरांकडे जाण्यास घाबरणार्या नागरिकांची आरोग्य तपासणी होऊन त्यांच्या छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार झाले पाहिजेत, अशी मूळ संकल्पना यात असून आपण फक्त निमित्त आहोत. नागरिकांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे याकरिता हा उपक्रम असल्याचे सुनील गोगटे यांनी सांगितले.
या उपक्रमात भाजप किसान मोर्चा प्रदेश चिटणीस सुनील गोगटे, जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर, जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, प्रज्ञा प्रकोष्ट संयोजक नितीन कांदळगावकर, कर्जत नगर परिषदेतील नगरसेविका विशाखा जिनगरे, बळवंत घुमरे, तालुका अध्यक्ष महिला आघाडी स्नेहा गोगटे, तसेच स्नेहा पिंगळे, गायत्री परांजपे, नीलिमा गोसावी, विजय कुलकर्णी, विजय जिनगरे, मंदार मेहेंदळे, हरीश ठाकरे, दिनेश भरकले, सर्वेश गोगटे, गणेश गवई, अनिता गवई, हरिश्चंद्र मांडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामाजिक अंतर राखत सहभागी होत आहेत. मी कर्जतकर अभियानाला कर्जतकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुनील गोगटे यांचे आभार मानले आहेत.