माणगाव : प्रतिनिधी – गेल्या आठ ते दहा दिवस खंड घेतलेल्या पावसाने शनिवार 4 जुलै पासून पुनः दमदार सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला असून पुन्हा लावणींच्या कामांना जोरदार सुरुवात झाली आहे.
7 जूनला सुरू झालेल्या पावसाने शेतातील तरवे तरारले होते. 22 जूनच्या आसपास लावणीच्या कामांना सुरुवात झाली होती. मात्र गेल्या दहा दिवसांत पावसाने उसंत घेतल्याने तरवे पिवळी पडली होती व लावणीची कामे थांबली होती. अनेक शेतकरी पंपाचा वापर करून लावणी करत होते. मात्र ही बाब खर्चिक असल्याने शेतकरी नाराज होते. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पावसाने पुनः दमदार हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा लावणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. पाऊस असाच सुरू राहिल्यास पुढील आठ ते दहा दिवसांत लावणीची कामे पूर्ण होतील असे चित्र शेतकरी सांगत आहेत.
पाऊस चांगला होत आहे. भाताचे तरवे चांगले वाढले आहेत. मोठा पाऊस सुरू झाल्याने लावणीच्या कामांनी पुनः गती घेतली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास लवकरच लावणी पूर्ण होईल .
– सिताराम पोटले, शेतकरी माणगाव