Breaking News

पेण एसटी स्थानकात पाणीच पाणी!

पेण : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेल्या पेण एसटी बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून राजकीय उदासीनता आणि शासकीय वेळकाढूपणामुळे या स्थानकाचा विकास होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पावसाळा सुरू झाल्याने येथे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षीची ही समस्या यंदाही कायम आहे.
लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या.लॉकडाऊननंतर काही भागात एसटी सेवा सुरू झाली, परंतु पेणमध्ये वेगळेच चित्र पहावयास मिळत आहे. येथील स्थानकाची दूरवस्था झाली असून, प्रवाशाच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी प्रशासनाचे पेणकरांच्या बाबतीत मात्र स्वप्नवत ठरत आहे.  
गेल्या महिन्यात निसर्ग चक्रीवादळात एसटी कार्यालयाच्या बाजूला पडलेले झाड अजूनही उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे कार्यालयाशेजारी पाणी साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रवाशांना जे थांबे दिले आहेत त्याच्या शेड कमकुवत झाल्या आहेत. यामुळे कधीही दुर्घटना होऊ शकते. अनेक होर्डिंग धोकादायक अवस्थेत आहेत. वारा-पावसामुळे ते कधी कोसळू शकतात.
लॉकडाऊनपूर्वी काही प्रमाणात स्थानकाला मुलामा देण्याचे तात्पुरत्या स्वरूपातील काम झाले होते. पावसाळ्यात या कामावर पाणी फेरले गेले असून, स्थानकात ठिकठिकाणी खड्डे पडून त्यात छोटी छोटी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. मुख्य पाणी जाणार्‍या गटारात माती, दगड अडकल्याने पाणी जाण्यास अडथळे निर्माण होत आहे.
चालक व वाहकांच्या विश्रामगृहाची अवस्थाही दयनीय असून, या ठिकाणी स्लॅबमधून पाणी गळत आहे. मागच्या वर्षी येथील स्लॅबचा तुकडा पडला होता. तेव्हा दुर्घटना होता होता टळली, परंतु अशा प्रकारे जीव मुठीत घेऊनच कर्मचारी आपले काम करीत आहेत.

पेण एसटी बसस्थानकातील पडलेले झाड काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, लवकर ते काढण्यात येईल. येथील सोयी-सुविधांबद्दल शासनाकडे पाठपुरावा चालू असून लॉकडाऊनमुळे काहीसा परिणाम झाला आहे.      
-अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक  

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply