पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या सन 2020-21च्या 945 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंगळवारी (दि. 13) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये महापालिका उद्याने विकास, वैद्यकीय सेवा व झोपडपट्टीत नागरी सुविधा देणे आणि नवीन गटारे बांधकाम व दुरूस्तीसाठी सन 2020-21च्या अर्थसंकल्पात तरतूद केल्याने पनवेल शहर स्वच्छ होण्यास मदत होऊन पनवेलकरांचा डासांचा त्रासही कमी होणार आहे. पनवेल महापालिकेची स्थायी समितीची सभा आर्थिक वर्ष सन 2019-20 आणि 2020-21च्या मूळ वार्षिक अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी मंगळवारी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी झाली. या सभेला सभापती प्रवीण पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर आणि सदस्य उपस्थित होते. या वेळी आयुक्तांनी सूचविलेल्या मूळ 906 कोटींच्या तरतुदीत सदस्यांनी दुरुस्ती सूचविल्याने 945 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यामध्ये सदस्यांनी जमा बाजूला मालमत्ता व इतर करात 10 कोटी, करेतर महसूल-शास्ति व शुल्कात 11 कोटी, एक टक्का मुद्रांक शुल्क नऊ कोटी, विकास शुल्क व फायर प्रीमियम पाच कोटी आणि जीएसटी अनुदान यात पाच कोटी अशी वाढ सूचविल्याने व शासनाकडून मिळणारे कोविड-19 अनुदान 15 कोटी असे 945 कोटी रुपये जमा होणार आहेत, तर इतर जमामध्ये 16 कोटींची घट सूचविण्यात आली आहे. महानगरपालिका हद्दीतील स्लॅब ड्रेन बांधकाम, स्टॉर्म वॉटर ड्रेन नवीन गटार बांधकाम व दुरूस्तीसाठी सन 2020-21च्या अर्थसंकल्पात आयुक्तांनी एक कोटी रुपयांची तरतूद सूचविली होती. सदस्यांनी ती 22 कोटींची केल्याने पनवेल शहर स्वच्छ राहून पनवेलकरांना डासांचा त्रासही कमी होणार आहे. याशिवाय वैद्यकीय सेवा, रुग्णालये 7.55 कोटी, उद्यान विकासासाठी पाच कोटी, झोपडपट्टी वसाहतीत नागरी सुविधा पुरवण्यासाठी तीन कोटी, क्रीडांगणे दोन कोटी, प्राथमिक शाळा इमारत दुरुस्ती तीन कोटी आणि आकस्मित कारणासाठी 9.85 कोटीची वाढ सूचविण्यात आली, तर अभिकारत्यामार्फत कचरा वाहतूक व मनुष्यबळ पुरवठा यासाठी 10 कोटी व इयत्र बाबींसाठी 4.4 कोटी घट सूचविण्यात येऊन 945 कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीने मंजूर केला आहे. पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या वतीने विविध लोकोपयोगी निर्णय, उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असतात. विविध सोयीसुविधांच्या माध्यमातून जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी आवश्यक ती पावले वेळोवेळी उचलली जात आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper