आमदार गणेश नाईक यांची मागणी
नवी मुंबई : बातमीदार
कोरोना महामारीने नागरिकांच्या हाताला काम उरलेले नाही. अनेकांच्या नोकर्या गेल्या असून, कित्येक जणांच्या पगारात कपात केली गेली आहे. अशा वेळी राज्य सरकारने नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित असताना उलट शासनाचे प्राधीकरण असलेल्या महावितरणकडून नागरिकांची लूट सुरू आहे. ती थांबावी यासाठी सरकारने महावितरणला निधी द्यावा आणि ग्राहकांची वीज बिले कमी करावीत, अशी मागणी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी केली. भाजपच्या वतीने मंगळवारी (दि. 7) संपूर्ण नवी मुंबईतील नोडल कार्यालयांत आंदोलन करण्यात आले. त्या वेळी आमदार नाईक बोलत होते.
विविध भागांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत भर पावसात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी अनेक पदाधिकार्यांनी महावितरणविरोधात फलक हातात घेऊन व घराजवळ उभे राहत निषेध नोंदवला. समाजमाध्यमांवरही निषेधाचे बॅनर झळकले. यात अनेक महिलाही घराघरांतून सहभागी झाल्या होत्या.
लॉकडाऊनच्या काळात दिली गेलेली वाढीव-जाचक वीज बिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, बिले भरूनही पुन्हा होणारी मागणी, वीज उपकरणांच्या योग्य देखभालीअभावी होणार्या दुर्घटना अशा या महावितरण कंपनीच्या अनागोंदी, आंधळ्या आणि लुटारू कारभाराविरोधात नवी मुंबई भाजपच्या वतीने आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या आंदोलनात माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नेत्रा शिर्के, डॉ. जयाजी नाथ, दशरथ भगत, सुरज पाटील, संपत शेवाळे आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.