Breaking News

काळसेकर पॉलिटेक्निकतर्फे करिअर मार्गदर्शन वेबिनार

पनवेल : रामप्रहर वृत्त

अंजुमन-ए-इस्लाम या अग्रणी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या, एन. बी. ए. मानांकन प्राप्त अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक, पनवेल द्वारा नुकतेच ऑनलाइन माध्यमातून दहावी, बारावी व आयटीआय विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व पदविका अभियांत्रिकीमधील संधी या विषयावर निशुल्क वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

कोविड प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा विचार करता, हा मार्गदर्शनपर वेबिनार ऑनलाइन माध्यमांतून झाला. महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच जिल्ह्यांसमवेत, देशभरातील विविध सहा राज्यांतील सुमारे 150  हून अधिक शाळा, महाविद्यालयांतील 1300 हून अधिक विद्यार्थी तसेच पालक, शिक्षक आदींनी या निशुल्क वेबिनार मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी यांच्या अध्यक्षतेत या वेबिनारमध्ये संस्थेचे जनरल सेक्रेटरी  जी. ए. आर. शेख, खजिनदार मोईज मियाजीवाला, अंजुमन-ए-इस्लाम, नवी मुंबई शिक्षण संस्थांचे एक्झिकेटिव्ह चेअरमन  बुरहान हरिस यांसमवेत डीटीईचे सहायक संचालक जे. आर. निखाडे, आरबीटीईचे सहाय्यक सचिव बी. व्ही. कर्‍हाडे, विशेष अधिकारी सदफ शेख, जीओ कंपनीचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट डॉ. मुनीर सय्यद या दिग्गज व अनुभवी मान्यवरांनी वेबिनारमधील उपस्थितांशी संवाद साधत त्यांना करिअर निवडीबाबत आणि पदविका अभियांत्रिकीनंतरच्या उपलब्ध संधींबाबत सुयोग्य मार्गदर्शन केले.

अंजुमन-ए-इस्लाम स्कूल कमिटीचे पदाधिकारीही या ऑनलाइन वेबिनारमध्ये उपस्थित होते.  वेबिनारच्या द्वितीयसत्रात उपस्थित शंकांचेही निरसन करण्यात आले. वेबिनारमधील सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल इ-सर्टिफिकेट देखील देण्यात आले. काळसेकर पॉलिटेक्निकच्या अधिकृत युट्युब चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालक हा वेबिनार परत पाहू शकतात.

काळसेकर टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. अब्दुल रझ्झाक होनुटगी आणि काळसेकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. रमजान खाटीक यांच्या नियोजनांतर्गत झालेल्या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. फरहान मुसा आणि त्यांच्या चमूने अथक परिश्रम घेतले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply