Breaking News

शेतकर्यांनी पिकास विमा संरक्षण घ्यावे

उपविभागीय कृषी अधिकार्‍यांचे आवाहन

महाड : प्रतिनिधी – खरीप आणि रब्बी हंगामासाठी शासनाने पीक विमा योजना तीन वर्षे राबविण्याबाबत निर्णय घेतला आहे. महाडमधील भात आणि नाचणी पिकविणार्‍या शेतकर्‍यांनी या पिकांसाठी विमा संरक्षण घेऊन आपले होणारे नुकसान टाळावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2020 व रब्बी हंगाम 2020-21पासून पीक विमा योजना तीन वर्षे राबविण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असून, रायगड जिल्ह्याकरिता एचडीएफसी अ‍ॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. मुंबई या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. पीक विमा योजनेतंर्गत हवामानातील प्रतिकूल घटकांमुळे व अपुर्‍या पावसामुळे पीक पेरणी व लावणी न झाल्याने होणारे नुकसान, पूर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात येणारी घट, पीक पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, ढगफुटीचा पूर, क्षेत्र जलमय होणे, किड व रोग अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान व नैसर्गिक कारणाने काढणीपश्चात होणारे नुकसान या जोखमीच्या बाबींकरिता विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

महाड तालुक्यातील शेतकर्‍यांनी भात पिकासाठी 9.10 रुपये प्रति गुंठा व नाचणी साठी 4 रुपये प्रति गुंठा विमा हप्ता नजीकच्या सरकार सामाईक सुविधा केंद्र, राष्ट्रीय बँक, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक येथे अंतिम मुदत 31 जुलैअखेरपर्यंत भरून पिकास संरक्षण मिळवावे तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी धुमाळ यांनी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply