पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाची साखळी तुटावी याकरीता पनवेल महापालिकेने दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केले आहे. यादरम्यान भाजीपाला किराणा दुकानांमध्ये काऊंटर सेल सुद्धा बंद करण्यात आला आहे. मात्र असे असताना खांदा वसाहत, कामोठे आणि कळंबोलीत भाजीवाले व काही किराणा दुकानदार सरळ सरळ विक्री करत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर लॉनडाऊनची कडकअंमलबजावणी करावी अशी मागणी भाजप नगरसेविका सीता पाटील यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना संक्रमण वाढत असल्याचे पाहून महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी 3 ते 14 जुलै यादरम्यान मनपा क्षेत्रात लॉकडाऊन जाहीर केला. जीवनावश्यक सेवा वगळून इतर दुकानांना टाळेबंदी लागू करण्यात आली. मात्र भाजी, दूध, फळे आणि किराणा खरेदी करण्याच्या नावावर अनेक जण विनाकारण बाहेर फिरताना आढळून आले आहेत. परिणामी कोरोना विषाणूची साखळी तुटणे कठीण होऊन बसले आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा पुरवणार्या दुकानांवर लॉकडाउन काळात निर्बंध आणण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतला आहे. सोमवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अन्नधान्य, भाजीपाला, अंडे, फळे, मासळी, चिकन मटण, दूध यांचा काउंटर सेल बंद करण्यात आला आहे. घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 9 ते रात्री 9 या दरम्यान परवानगी देण्यात आली आहे. याबाबत अंमलबजावणीही करण्यात आलेले आहेत. परंतु तरीसुद्धा खांदा वसाहतीतील भाजी विक्रेते आणि किराणा दुकानदार सकाळी काऊंटरवर वस्तु देत असल्याचे निदर्शनास येत आहे. ग्राहकांची ही त्याठिकाणी गर्दी होत आहे. ही स्थिती कामोठे वसाहत व कळंबोलीत काही प्रमाणात आहे. येथे भाजीपाला विक्री थेट ग्राहकांना केली जात आहे. महापालिकेने यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणी भाजप नगरसेविका सीता सदानंद पाटील यांनी केली आहे. आदेशाची पायमल्ली करुन दुकाने सुरू महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख हे सक्षम अधिकारी आहेत. भाजीपाला किराणा दुकानांचे काउंटर सेल बंद करण्याबाबत त्यांनी आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. परंतु काही दुकानदार या आदेशाची पायमल्ली करत आहेत. महापालिका किंवा पोलीस आले लगेच ते दुकान बंद करतात. ते गेले की पुन्हा विक्री सुरू होते ही वस्तुस्थिती सिडको वसाहतीमध्ये दिसून येत आहे.