कर्जत : बातमीदार
मध्य रेल्वेच्या कर्जत या महत्वाच्या स्थानकात लावण्यात आलेले पंखे रेल्वे प्रशासनाने काढून टाकले आहेत. त्यामुळे ऑक्टोबर हीटमध्ये या स्थानकात प्रवाशांवर घामाघुम होण्याची वेळ आली आहे. दरम्यान, त्याबाबत कर्जत पॅसेंजर असोसिएशनने रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जत रेल्वे स्थानकात दक्षिणेकडे जाणार्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक दिवसरात्र सुरू असते. तर मुंबई सीएसएमटी आणि खोपोलीकडील लोकल या स्थानकातून ये-जा करीत असतात. त्यामुळे या रेल्वे स्थानकात कायम प्रवाशांची वर्दळ असते. या स्थानकात ईएमयू आणि अन्य तीन असे एकूण चार फलाट असून तेथे प्रवाशांच्या सोयीसाठी पंखे बसविण्यात आले होते. मात्र ते रेल्वे प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. तेथे नवीन पंखे बसविले जाणार असल्याचे पीडब्लूआय विभागाकडून सांगण्यात येत आहे. नवीन पंखे उपलब्ध झाले नसताना जुने पंखे काढण्याची घाई रेल्वेकडून करण्याची गरज काय, असा प्रश्न असून रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. तर कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनकडून तत्काळ मुंबई विभागीय महाव्यवस्थापक कार्यालयाला पत्र व्यवहार करण्यात आला आहे. नगरसेवक बळवंत घुमरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी, अशी मागणी केली आहे.